कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी
कोल्हापूर : कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर किरवे तसेच खोकुरले येथे रस्त्यावर पाणी आले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होऊन कोकणात जाणारी वाहतूक टप्प झाली आहे.
Eत्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.
दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अंदाजानुसार, आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस या सारख्या पिकांना या पावसाचा प्रचंड फटका बसला असून, शेतात पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत.