ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक
मुंबई: जालना जिल्ह्यातील हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील मुलांसाठी सॅक्रेड आणि स्वराज या दोन संस्था गेल्या ८ वर्षांपासून कुटुंब आणि समाजाधारीत काळजी आणि संगोपन व्यवस्था हा उपक्रम राबवीत आहेत. या कामात त्यांना युनिसेफ मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य लाभले आहे. या उपक्रमात स्थलांतर करणारी कुटुंबे त्यांच्या मुलांना आज्जी आजोबा किंवा जवळचे नातेवाईक यांच्याकडे सोपवून जातात. यामुळे त्या मुलांचे शिक्षण अखंडितपणे चालू राहते व स्थलांतराच्या ठिकाणी निर्माण होणारे त्यांच्या सुरक्षेचे प्रश्नही उपस्थित होत नाहीत.
या मुलांच्या शिक्षण, पोषण, सुरक्षा इत्यादी बाबींकडे त्या त्या गावातील तरुण स्वयंसेवक जातीने लक्ष पुरवतात. त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर किंवा भरायच्या आधी ते मुलांचे खेळ वर्ग आणि अभ्यास वर्ग घेतात. हे स्वयंसेवक बालमित्र या नावाने ओळखले जातात. गावातील लोकच यांची निवड करतात. यांना सॅक्रेड आणि स्वराज यांच्या तर्फे प्रशिक्षण दिले जाते. आज बालमित्रांच्या प्रयत्नांनी जालना जिल्ह्यातील २६० गावांमध्ये जवळजवळ ६००० मुले स्थलांतराच्या काळात मागे राहत आहेत. या बालमित्रांचा गुणगौरव सोहळा १५ मे रोजी जालना जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी काही निवडक बालमित्रांनी आपले विचार व्यक्त केले. त्यापैकी काहीजण बालमित्र म्हणून काम करीत असतांना मिळालेल्या अनुभवाचा फायदा घेऊन आज सरपंच, अंगणवाडी ताई, मुख्याध्यापक, मास्टर ट्रेनर अश्या विविध पदांवर कार्यरत आहेत. या सोहळ्यामुळे आपल्या कष्टाचे चीज झाले आहे आणि हे सेवाभावी काम करण्यास अधिकच प्रोत्साहन मिळाले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बालमित्रांच्या या मेळाव्याला संबोधित करतांना मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले “ आज प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये अनेक समित्या, कार्यकर्ते आणि लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत. पण बालकांची सुरक्षा, शिक्षण आणि त्याच बरोबर सामाजिक जागृती आणि युवक युवतींची क्षमता बांधणी यात तुम्ही करत असलेले कार्य केवळ अतुलनीय आहे.
सामाजिक सेवेचा हा वसा बालमित्रांच्या एका तुकडी कडून पुढच्या तुकडीकडे हस्तांतर होत आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेले स्थलांतराचे दुष्टचक्र या येणाऱ्या पिढीत तरी भंग होईल अशी आशा निर्माण झाली आहे.” त्याच बरोबर आजपर्यंत या उपक्रमाला त्यांच्याकडून मिळत असलेले संवेदनशील आणि सक्रीय पाठबळ या पुढेही मिळत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी खास करून बाल मैत्रिणींना बाल विवाहाच्या सापळ्यात न अडकता प्रथम आपले शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्यांनी या कामामध्ये आरोग्य, शिक्षण आणि जि.म.बा. यासारख्या विभागांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याची विनंती केली. युनिसेफ च्या राज्य बाल संरक्षण तज्ञ अल्पा वोरा यांनी असे प्रतिपादन केले की बालकांची सुरक्षा आणि त्यांचे योग्य पालनपोषण यावरच समाजाची संवेदनशीलता आणि ताकद दिसून येते. सॅक्रेड आणि स्वराज या संस्था आणि असंख्य बाल मित्रांचे अविरत प्रयत्न यांच्या द्वारे जालना जिल्ह्यातील हजारो मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा याची काळजी त्यांच्या घराच्या उबदार वातावरणातच राहून घेतली जात आहे.
या प्रसंगी आरोग्य, शिक्षण इत्यादी विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच बरोबर जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून जवळजवळ ४५० बालमित्र या कार्यक्रमात सहभागी झाले. सॅक्रेडचे सचिव रवि केळगावकर आणि स्वराज चे अध्यक्ष भाऊसाहेब गुंजाळ यांनी सूत्र संचालन केले. त्याच बरोबर या दोन ही संस्थांचे अधिकारी आणि असंख्य बालमित्र यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वप्रथम मा. जिल्हाधिकारी यांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर युनिसेफ त्यानंतर अश्या तरुणांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.