Photo Credit- Social media
नागपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. मात्र, आता यावरच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने मला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता. परंतु मी तो फेटाळला’, असा दावा त्यांनी केला.
हेदेखील वाचा : साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग; उदयनराजे भोसलेंची जलमंदिर पॅलेसमध्ये खलबतं
पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने मला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी त्या नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला सर्व दिले आहे ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. कोणतीही ऑफर मला मोहात पाडू शकत नाही’. मात्र, गडकरींनी त्या विरोधी पक्षनेत्याचे नाव किंवा पक्षाची ओळख उघड केले नाही.
दरम्यान, आता तो विरोधी नेता कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याने विरोधकांची पंचाईत झाली आहे.
तत्त्वांशी तडजोड करणार नाही
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी असे मानले जात होते की भाजप पूर्ण बहुमत मिळवू शकणार नाही. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता पडेल. मी त्यांना स्पष्ट सांगितले की मी काही तत्त्वे व विश्वासांसह वाढलो, त्यांच्याशी तडजोड करणार नाही.
– नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री.
भाजपला नव्हता बहुमताचा विश्वास
लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते हे विशेष. भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या, त्यानंतर टीडीपी, जदयु यांसारख्या पक्षांच्या मदतीने एनडीए सरकार स्थापन करावे लागले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले होते. यावेळी, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली, ज्याने एकत्रितपणे देशभरात निवडणुका लढवल्या. याचा परिणाम असा झाला की एनडीएसाठी 400 चा आकडा पार करण्याचा दावा करणारी भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिली.
हेदेखील वाचा : केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांबाबत ‘या’ निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले स्वागत!