बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी केंद्रात मंत्री असेन, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू असताना जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी पवारांनी जानकर यांना माढा मतदारसंघाची महाविकास आघाडीत उमेदवारी देण्याचे नक्की केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हालचाल करत जानकर यांना मुंबईत पाचारण करत महायुतीची उमेदवारी घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांना केंद्रात मंत्री करण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. त्यामुळे जानकर यांनी पवारांची ऑफर झुगारून महायुतीची परभणीमधून उमेदवारी स्वीकारली.
जानकर यांनी म्हटले की, सुनेत्रा पवारांना भरघोस मते देऊन खासदार करावे. त्यानंतर आम्ही बारामतीसाठी मोठा विकासनिधी आणू. हे मी भावी केंद्रीय मंत्री म्हणून बोलतोय, असे जानकर यांनी जाहीर केले. मी आता सांगतोय, आम्ही निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवत आहोत. मी एनडीएच्या सरकारमधील भावी मंत्री म्हणून बोलत आहे.