'या' ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा,अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच याच परिसरातील कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न सुध्दा तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगावसह हिवरे ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रांजणगाव गणपती हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी असल्यामुळे येथे असणारे कामगार, तसेच हे गाव प्रमुख रस्त्यालगत असल्याने बाहेरील लोकांची स्थलांतरित लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणे ही अत्यावश्यक असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीने या भागात विकास कामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
या बैठकीत रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण आदी विषयांवरील अडचणी मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसीचे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी पक्षांतर्गत बदलाचे संकेत दिले होते. ज्यांना वेळ देता येत नाही, त्यांनी बाजूला व्हावे अशी सूचना केली होती. त्यांनी जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना टाळणाऱ्या पालकमंत्री आणि मंत्र्यांवरही नाराजी व्यक्त केली होती. हीच नाराजी बाबा गुजर यांनी यापूर्वीसुद्धा व्यक्त केली होती. चिंतन शिबिर आटोपल्यानंतर अनेक मंत्री नागपूरमध्ये मुक्कामाला होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या खात्यांतर्गत येणाऱ्या विविध संघटनांच्या बैठका घेतल्या. त्याची माहिती नागपूरमधील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती.






