धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून महिला सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) तसेच बसस्थानक परिसरात मुलींना टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासाबाबत वाढत्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीच्या व संवेदनशील ठिकाणी महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी नगराध्यक्षा काकडे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.
त्यामध्ये विशेषतः निर्भय व पिंक पथकाची गस्त वाढविणे, महिलांच्या तक्रारींवर तातडीने कठोर कारवाई करणे तसेच महिलांमध्ये सुरक्षिततेचा व विश्वासाचा माहोल निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय राहावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. पोलीस अधीक्षक खोकर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत महिला सुरक्षा हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. शहरातील असुरक्षित ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या भागात पोलीस बंदोबस्त व गस्त अधिक प्रभावी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर महिला व मुलींसाठी सुरक्षित, निर्भय आणि विश्वासार्ह बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे नगराध्यक्षा काकडे यांनी सांगितले आहे. या बैठकीस कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा कापसे तसेच धाराशिव नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांचीही उपस्थिती होती. या उपक्रमामुळे शहरातील महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी नगरपरिषदेमार्फत विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आज ६ मार्च रोजी महिला व बालकल्याण सभापतींच्या दालनात सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आमदार राणाजगजीतसिंह पाटील व अर्चना पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या कार्यक्रमात नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी, विविध शाळांमधील महिला कर्मचारी, कंत्राटी महिला कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे २०० महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानित महिलांना सन्मानचिन्ह देऊन तसेच अल्पोपहार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि मदर तेरेसा यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा नेहा काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह नगरपरिषदेतील महिला कर्मचारी व महिला नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला उपसभापती दिपाली पाटील, समिती सदस्य नगरसेविका वैशाली मुंडे, अलका पारवे, आजमासबा पठाण, रूपाली आंबेकर तसेच महिला व बालकल्याण विभागातील कर्मचारी वैशाली आव्हाड उपस्थित होत्या.






