संग्रहित फोटो
बारामती: सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुहिमुळे बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत, या पार्श्वभूमीवर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी(दि १७) विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहेत.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गटामुळे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सध्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दररोज मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मात्र बारामती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा हाती घ्यायचा, याची चिंता आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते जेवढे प्रेम शरद पवार यांच्यावर करतात, तेवढेच प्रेम अजित पवार यांच्यावर देखील करतात. संपूर्ण पवार कुटुंबीयांना मानणारा मोठा गट बारामतीमध्ये आहे. पवार कुटुंबीयांमध्ये पडलेले दोन गट बारामतीकरांना मान्य नाहीत. परंतु सध्या अजित पवार यांच्याशी संपर्क असणारा गट अजित पवार यांनाच समर्थन देत आहे. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दिनांक १७ जुलै रोजी बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये विशेष बैठकीचे आयोजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, या उपक्रमाचे नियोजन या बैठकीत होणार आहे. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र पदाधिकारी व कार्यकर्ते भरून देणार आहेत, या प्रतिज्ञा पत्रासोबत आधार कार्ड झेरॉक्स जोडून त्यावर सही करून ही मोहीम राबवली जाणार आहे. एकंदरीत राष्ट्रवादीच्या या मोहिमेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट कसे प्रत्युत्तर देणार, हे या मोहिमेनंतर स्पष्ट होणार आहे. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनोख्या मोहिमेमुळे राज्यांमध्ये याचे तीव्र पडसाद उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अर्थमंत्री पद मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री त्यांच्या काकी प्रतिभा पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या या भेटीचे वृत्त समजतात बारामतीतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पवार कुटुंबातील राजकीय वाद मिटेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. मात्र बारामतीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमुळे राजकीय दोन्ही या दोन गटात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.