कल्याण – अमजद खान : बोगस कागदपत्रे तयार करुन बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. आता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण भूमी अभिलेखा विभागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची चाैकशी सुरु आहे. नकाशा आणि त्यासाठी लागणारे स्टॅम्प आणि इतर साहित्य वापर या कार्यालयातून झाला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टीएलआर कार्यालयात दाखल झाले. पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाब दाणाणले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडकल यांनी मुख्य अभिलेखा अधिकारी नितीन साळूंखे यांना कार्यालयात सर्च करण्याकरीता वॉरंट त्यांच्या हाती दिले. साळूंखे यांना आधी काही समजले नाही. नंतर त्यांना सांगितले गेले की, कागद वाचून पहा. पोलिसांनी सांगितले की, कार्यालयातील काही साहित्याची चौकशीची करणार आहोत. यानंतर कार्यालयातील पहिला आणि दुसरा मजल्यावरील दस्ताऐवजाची पडताळणी सुरु केली.
चार दिवसांपूर्वी केडीएमसीचे दोन अधिकारी राजेश बागुल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती. केडीएमसी नगररचना विभागातील या दोन अधिकाऱ्यांनी २००९ आणि २०२१ साली दोन इमारतीच्या बांधकाम परवानगी प्रकरणी बोगस कागदपत्रे तयार केली होती. कल्याण टीएलआर कार्यालयातील दस्ताऐवज आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात टीएलआर कार्यालयातील कोण सामिल आहे. स्टॅम्प आणि कागदपत्रे या अधिकाऱ्यांना कशी मिळाली, केडीएमसीचे आणखीन किती अधिकारी सामिल आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत.