पंढरीच्या वारीवर AIचा करडा पहारा; ड्रोन, अँटी-ड्रोन गन अन् फेस रिकग्निशनने अभेद्य सुरक्षा कवच
पंढरपूर | प्रतिनिधी : आषाढी वारी २०२६ मध्ये सुमारे २५ ते ३० लाख भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने यंदा अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. ड्रोन, अँटी-ड्रोन गन, फेस रिकग्निशन प्रणाली आणि इंटिग्रेटेड कंट्रोल रूमच्या माध्यमातून संपूर्ण वारीवर हायटेक नजर ठेवली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या आधुनिक यंत्रणेची पाहणी पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांनी पंढरपूर येथे केली. त्यांनी विविध तांत्रिक सुविधांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून त्याचा आढावा घेतला तसेच आणखी आवश्यक तांत्रिक सुविधांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या.
वारीदरम्यान गर्दीच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळावी, भाविकांची संख्या मोजता यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना देता याव्यात यासाठी AI आधारित ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. या ड्रोनवर साऊंड सिस्टीम बसविण्यात आली असून त्याद्वारे भाविकांना वेळोवेळी सूचना देण्यात येतील.
Indrayani River Flood: इंद्रायणीचे पाणी ओसरले, पण जखमा कायम! देहू आणि आळंदीत संसाराचा कोळसा
वारीचे पावित्र्य आणि भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी खासगी ड्रोन उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे उल्लंघन करून कोणी ड्रोन उडविल्यास ते तात्काळ निष्क्रिय करण्यासाठी अत्याधुनिक अँटी-ड्रोन गन सज्ज ठेवण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या इंटिग्रेटेड कंट्रोल रूममधून पोलीस, महसूल, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व विभागांचे प्रतिनिधी २४ तास समन्वय साधणार आहेत. यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्येवर तातडीने निर्णय घेऊन भाविकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या नियंत्रण कक्षातून केली जाणार आहे.
Ashadhi Wari 2026: लाखो वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी AI आधारित फेस रिकग्निशन प्रणालीदेखील कार्यान्वित केली आहे. अभिलेखावरील गुन्हेगारांची ओळख या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून, या व्यवस्थेचाही जी. श्रीधर यांनी आढावा घेतला.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.






