आषाढी वारीला आजपासून सुरुवात (फोटो- सोशल मीडिया)
देहू (अमोल येलमार) : पंढरीस जाय। तो विसरे बापमाय॥ अवघा होय पांडुरंग। राहे धरूनियां अंग॥ न लगे धन मान। देह भावे उदासीन॥ तुका म्हणे मळ। नाशी तत्काळ ते स्थळ॥
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340 वा आषाढी पायी वारी सोहळा बुधवार (दि. 18) दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी देहूगावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुमित्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही! पुण्यनगरीत माऊलींचे अश्व श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या चरणी नतमस्तक
बुधवारी पहाटे पाच वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख हभप दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा व आरती झाली.
पहाटे 5.30 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी पूजा व आरती झाली. सकाळी 9 ते 11 श्री तुकोबारायांच्या पादुकांची पूजा इनामदारसाहेब वाड्यात करण्यात आली आहे. त्यानंतर परंपरेनुसार संस्थानच्या वतीने या पादुका डोईवर घेऊन मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. सकाळी 10 ते 12 या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सप्ताहाची सांगता झाली.
दुपारी तीन वाजता प्रमुख मान्यवर व महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांना महाभिषेक घालून महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रमुख दिंड्याच्या उपस्थित आणि वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात, गरुड, टक्के यांचा समवेत पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान झाली. सायंकाळी पालखी श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावली.
🕐 1.02pm | 18-6-2025📍Pune.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/BR32I3wUSH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2025
एनडीआरएफची तुकडी
इंद्रायणी नदीच्या घाटावर एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. नदीकिनारी जीवरक्षकही नेमण्यात आले होते. तर मुख्य मार्गांवर आणि मुक्कामस्थळी एकूण ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
पोलिस यंत्रणेच्या वतीने पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, १५ पोलिस निरीक्षक, ४३५ पोलिस अंमलदार आणि १३४ होमगार्ड, अशा मोठ्या फौजफाट्याची नियुक्ती करण्यात आली होती.
१२०० तात्पुरती स्वच्छतागृहे
नगरपंचायतीच्या वतीने १२०० तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती. स्वच्छता आणि पाण्याची उपलब्धता याची नियमित देखरेख केली जात होती.
पाण्यासाठी टँकर आणि अन्नदान
पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून टँकरची सोय करण्यात आली होती. विविध अन्नदान मंडळांमार्फत हजारो वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान करण्यात आले आहे. श्रीसंत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाचे सेवाकार्य सुरू होते.
वाहतूक आणि दर्शन व्यवस्था
वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पीएमपीएमएल आणि एसटी बससेवेद्वारे आळंदी, मनपाभवन, निगडी आणि देहूरोडकडे जाण्याची सुविधा उपलब्ध होती. दर्शनासाठी सर्व प्रवेशद्वारांवर धातुशोधक यंत्रे बसवण्यात आली होती.
आरोग्यसेवा सज्ज
गावातील रुग्णालयांमध्ये खास बेड राखीव ठेवण्यात आले होती. गाथा मंदिर, मुख्य मंदिर व वैकुंठगमन मंदिर परिसरात बाह्यरुग्ण सेवा सुरू होती. १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका, कार्डियाक ॲम्बुलन्स व आरोग्य केंद्रांच्या गाड्या होत्या.