जतचा दुष्काळ कायमचा हटवणार; आमदार गोपीचंद पडळकर यांचे आश्वासन (फोटो- ट्विटर )
जत : प्रस्थापित राजकारण्यांनी दुष्काळी जत, आटपाडी, खानापूरसारख्या तालुक्यांवर मोठा अन्याय केला. या अन्यायाच्या विरोधात माझी लढाई आहे. जत तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे इथले सारे प्रश्न सोडवणे, हे माझं कर्तव्य आहे. निवडणुकीत जी काही आश्वासने दिली, त्यातला एकही प्रश्न राहणार नाही. याउलट हा मतदारसंघ पाहायला लोक येतील, असे सांगून पुढच्या दोन वर्षांत जत तालुक्यात दुष्काळ कायमचा हटवणार, असे आश्वासन भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले.
जतच्या वंचित 65 गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या विस्तारित योजनेत आणखीन दोन नव्या पाईपलाईनचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जत तालुक्यासाठी स्वतंत्रपणे आरटीओ कार्यालयास मंजूरी दिल्याबद्दल जत शहरातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात आमदार पडळकर बोलत होते. येथील थोरली वेस येथे झालेल्या जाहीर सत्कार सोहळ्यात शहर व तालुक्यातील विविध 32 संघटनांनी त्यांचा गौरव केला.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मदन बोर्गीकर होते. यावेळी सुभाष गोब्बी, बाळासाहेब हुंचाळकर, सरदार पाटील, रवी मानवर, अण्णा भिसे, अतुल मोरे, परशूराम मोरे यांच्या पदाधिकारी उपस्थित होते.
विस्तारित योजनेत वाढ
निवडणुकीत मी इथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला आहे. राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघाला काही कमी पडणार नाही, असा शब्द दिला आहे. फडणवीस शब्द पाळणारे नेते आहेत. त्यामुळे या मतदारसंघाने आता कसलीच चिंता बाळगण्याचे कारण नाही. पुढच्या दोन वर्षात आपण विस्तारीत योजनेचे काम पूर्ण करणार आहोत. शिवाय विस्तारीत योजनेत सध्या दोन पाईपने पाणी येणार आहे, हे पाणी २५० क्युसेकने येईल. यात आणखीन दोन नव्या पाईपलाईन समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बुधवारी यावर मंत्रालयात बैठक होणार असून, तो प्रश्न देखील सोडवून घेऊ, असेही सांगितले.