संग्रहित फोटो
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधी लागेल, याची वाट न पाहता तयारी सुरू करा. कोणतेही आरक्षण पडले तरी, आपला उमेदवार निवडून यायला हवा. आपल्यासाठी ही लढाई नवीन नाही, निवडणूकीच्या तयारीला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
सांगलीत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सदाशिवराव पाटील, शिवाजीराव नाईक आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकी अगोदर सरकारने प्रत्येक समाजासाठी महामंडळ करणार, अशी घोषणा केली. विविध घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात तरतूद केली नाही. सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. ओबीसींचे प्रश्न घेऊन लढाई लढावी लागेल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही, कामगारांना पगार नाहीत. सवलतीही नाहीत. स्पर्धा परीक्षा विद्याथ्यांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. लोकांच्या बरोबर राहा. ज्या लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आलेली आहेत, त्यांना बरोबर घेऊन जन आंदोलन करा. अन्यायाला वाचा फोडणारी आंदोलने करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. जिल्हा परिषदनिहाय मेळावे घ्या. मित्रपक्ष काय करणार याचा विचार करू नका, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालाच्या भ्रमात राहिल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. दूध, साखर यासह सर्व प्रश्नांवर आंदोलन करून न्याय द्यावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही. ५५ लाख लाडक्या बहिणींची नावे वगळली आहेत. त्यांना बरोबर घेऊन आंदोलन करावे लागेल.
अल्पसंख्याकांमध्ये दहशत
मेळाव्यामध्ये काही वक्त्यांनी, अल्पसंख्याकांमध्ये विशेषतः मुस्लिम समाजात दहशत आहे, याचा उल्लेख केला. त्याचा संदर्भ घेऊन जयंत पाटील म्हणाले, अल्पसंख्याक समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनेने दिलेल्या अधिकारावर गदा नको. बटेंगे तो कटेंगेऐवजी पढ़ेंगे तो बहेंगेचा नारा द्यायला हवा. ‘एआय’मुळे मोठे बदल होत आहेत. जग ‘एआय’कडे जात असताना आपण १७ व्या शतकाकडे निघालो आहोत.
रोहित यांनी जिल्ह्यात पक्ष मजबूत करावा
जयंत पाटील म्हणाले, आर. आर. आबा पाटील आणि मी बरोबरीने राष्ट्रवादीची ताकद वाढवली. आबा राज्यभर फिरायचे, आता माझ्यावर ती जबाबदारी आहे. रोहित पाटील यांनी जिल्हाभर फिरून संघटन मजबूत करावे. तरुणांची फौज तयार करावी.