कराड शहरसह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
कराड : कराड शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, कालवडे, नांदगाव, काले, वाठार, रेठरे खुर्द परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेत-शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे परिसरातील शेती मशागतींच्या कामांचा मोठा खोळंबा झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कराड शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. तर महामार्गावरील वाहतुकही धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील नाले तुडुंब वाहून अनेक ठिकाणी रस्त्यांवरील चेंबरमधून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने पादचाऱ्यांची कसरत झाली. तसेच सकल भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्याचबरोबर गुरुवारी आठवडी बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या पावसामुळे रस्त्यानजीकच्या अनेक दुकानगाळ्यांमध्येही पाणी शिरले होते. विद्युत मोटारींच्या साह्याने हे पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. काही व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
शेतीची कामे खोळंबली
गेल्या 15 दिवसांपासून कराड तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी भागात वादळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. याचा ग्रामीण भागातील शेती मशागतींच्या कामांवर मोठा परिणाम झाला असून, ही कामे खोळंबली आहेत. दरम्यान, पावसाने चार, दोन दिवसांची उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतींची कामे हातावेगळी करण्यावर भर दिला होता. मात्र, बहुतांशी ठिकाणी शेत जमिनींना वापसा नसल्याने अनेक ठिकाणी ही कामे रखडली होती. त्यात बुधवारी रात्रीपासून वादळी पावसाने पुन्हा जोर धरला.
वादळी पावसाचा जोरदार तडाखा
गुरुवारी सायंकाळी कराड व मलकापूर शहरासह तालुक्याच्या बहुतांशी भागाला वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. यामध्ये कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, कालवडे, नांदगाव, काले, वाठार, रेठरे खुर्द परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने येथील शेत-शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. यामुळे अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटून मोठ्या प्रमाणात शेतातील माती वाहून गेली. यामुळे शेतीचेही नुकसान झाले असून मशागतींचे कामे आणखी लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
सांगली, सातारा, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांत शुक्रवारी 24 तासांत जोरदार वारे आणि विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत मान्सूनच्या आगमनाआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा तडाका बसल्याने जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता कमी होऊन ओढे, नाल्यांना पाणी आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.