Photo Credit : Team Navrashtra
कर्जत-जामखेड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात विधानसभा निवडणूकपूर्व वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून राज्यभरात चाचपण्या सुरू झाल्या आहेत. अशातच एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत- जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नक्की चाललयं तरी काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अजित पवार यांच्याकडे आहे. पण, गेल्या वर्षी अजित पवार आपल्या 40 आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. एकसंध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यातून पवार कुटुंबियांतील संबंध ताणले गेले. एरवी कौटुंबिक ऐक्याचे गीत गाणारे पवार परिवारातील सदस्य सार्वजनिक जीवनात एकमेकांवर बेछूट आरोप प्रत्यारोप करू लागले. नुकत्याच झालेल्य लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यात अटीतटीची लढत झाली. सुप्रिया सुळे तब्बल दीड लाख मताधिक्क्याने निवडून आल्या आणि बारामती शरद पवारांचीच, ही बाब अधोरेखित केली.
आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच अजित पवार मुलासाठी बारामती सोडणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पण, राज्यातील बदलत्या राजकारणानुसार राजकीय समीकरणेही बदलली आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर यात खूप बदल झाले आहेत.
हेदेखील वाचा: अजित पवारांची नवी खेळी; बारामती सोडून ‘या’ मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
स्थानिक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार त्यांचे पुत्र जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात, असे सांगितले जात आहे. जय पवार यांच्यासाठी आपला बारामतीचा बालेकिल्ला सोडण्याचे संकेतही अजित पवारांनी दिले. पण, मुलगा जय पवार यांच्यासाठी बारामती सोडल्यावर अजित पवार कोणता मतदार संघ निवडणार, असा प्रश्न उपस्थित होत असताना ते कर्जत जामखेडच्या मैदानातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने कर्जत जामखेडसाठी अजित दादांकडून चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तिथेही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
अजित पवार कर्जत जामखेडमधून लढण्यास इच्छुक असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पण, रोहित पवारांकडून ही भावनिक खेळी खेळली जात असल्याचेही बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे, 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून आले. पण, आता महाविकास आघाडीतूनच रोहित पवार यांना विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी रोहित पवार असा दावा करत असावेत, अशी चर्चा आहे.
हेदेखील वाचा: सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता?; अजित पवारांनी सगळच सांगितलं
अजित पवार महायुतीत सामील झाल्यापासून अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीत कर्जत- जामखेड हा मतदारसंघ भाजपकडे आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रत्येक जागा भाजपचाच उमेदवार लढवणार असल्याचे विधान केले होते. 2014-19 या काळात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजप नेते राम शिंदे यांच्याकडे होता. या काळात फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भुषवले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत जामखेडमध्ये भाजपने राम शिंदे यांच्यासाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बाबी पाहता कर्जत-जामखेड मतदारसंघ अजित पवारांना सोडून महायुतीतील घटक पक्ष जोखीम घेणार नाहीत.
दुसरीकडे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर अलीकडच्या काळात पक्षसंघटन आणि पक्ष नेतृत्त्व करण्याकडे अजित पवारांचा कल असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर अजित पवार राज्यभरात पक्षसंघटनाकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहेत. अजित पवार यांनी आपल्या नैसर्गिक स्वभावासह एकूणच पेहरावात बदल करत राज्याच्या राजकारणाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडच्या काळात सरकारी व्यासपीठांवरील अजित पवार यांची उपस्थिती आणि शासकीय कार्यक्रमांचे ते करीत असलेले नेतृत्व पाहता कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यात अजित पवार यशस्वी ठरत असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. अर्थात विधानसभा निवडणुकीला अद्याप एक ते दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे आणि पुलाखालून अजून बरेच पाणी वाहायचे बाकी आहे. राजकीय चालींमध्ये माहिर असलेल्या शरद पवार यांच्याकडून आगामी काळात अजित पवार यांना नमविण्यासाठी कोणती खेळी खेळली जाते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेदेखील वाचा: दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था; भाजप नेत्याची बोचरी टीका
बारामतीचे काय?
आपले होमग्राऊंड असलेला बारामती विधानसभा मतदारसंघ मुलाला देण्यासाठी अजित पवार आग्रही असल्याचेही स्थानिक सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पण, अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, यावरही अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. काही दिवसांपासून शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. युगेंद्र पवार यांचे बारामतीतील काम पाहता त्यांना शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळाल्यास ते निव़डून येऊ शकतात, असेही सांगितले जाते. विशेष म्हणजे युगेंद्र पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील वावरही अलिकडच्या काळात कमालीचा वाढला आहे. अशातच अजित पवारांनी पुत्र जय पवार यांना उमेदवारी दिल्यास युगेंद्र पवार निव़डून येण्याची सर्वाधिक शक्यता अधिक आहे.
बारामतीच्या एकूणच विकास व राजकारणात अजित पवारांचे योगदान नाकारता येण्यासारखे नाही. लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार अशी चर्चा यापुर्वीही बारामतीत झाल्याने सेफ साइड म्हणून अजित पवार बारामतीचाच पर्याय निवडतील व महायुतीकडूनही त्यांना बारामतीबाबतच आग्रह केला जाईल, अशी माहिती अजित पवार गटातील सूत्रांकडून मिळते.