100 वर्षापूर्वी कर्जत येथे टाटा कंपनी कडून पुणे जिल्ह्यात बांधलेल्या धरणाचे पाणी कर्जत तालुक्यात आणण्यात आले.त्या पाण्यावर वीज निर्मिती करून सदर वीज मुंबई पर्यंत नेण्यात आली.आता याच वीज निर्मिती केंद्राच्या बाजूला असलेल्या ओसाड जमिनीवर खोल खड्डा खोदून पाणी साठवण करणारे धरण बांधले जात आहे.या धरणाचे साठवण बंधाऱ्या साठी तब्बल 65 एकर जमिनीमध्ये खोल खड्डा बनविला जात आहे.65 एकर मध्ये खड्डा खोदण्यासाठी अनेक प्रोक्लेम मशीन वापरल्या जात आहेत.येथील दगड फोडण्यासाठी मे 2025 पासून दररोज सुरुंग स्फोट केले जात आहेत.या कामाच्या अगदी बाजूला तापकीरवाडीची आदिवासी वाडी बसली आहे.या गाडीमध्ये 22 कुटुंब राहत असून या ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना तेथे राहणे कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे येथील सर्व आदिवासी लोक भीतीच्या छायेत असून घरावर पडणारे दगड आणि घरांना पडलेल्या भेगा यामुळे आदिवासी मरणयातना सहन करून राहत आहे.
टाटा कंपनी कडून सुरुंग स्फोट करताना काहीवेळा आदिवासी वाडीमध्ये येऊन आगाऊ सूचना देण्यात येत असतात.मात्र याचे प्रमाण जेमतेम 5 टक्के असून सातत्याने होणारे सुरुंग स्फोट यामुळे येथील आदिवासी लोकांना अनेकदा टाटा कंपनी मध्ये घुसून जाब विचारला आहे.अनेकदा येथील आदिवासी लोकांनी रात्र सुरुंग स्फोट होतात त्या भागात काढली आहे.त्या वेळी कंपनी कडून केवळ आता सुरुंग स्फोट करणार नाहीत असे सांगण्यात येत असते.मात्र पुन्हा सुरुंग स्फोट सुरू होतात असा आरोप गुलाब वाघमारे यांनी केला आहे.टाटा कंपनी आपले शब्द पाळण्याचे काम करीत नसल्याने आदिवासी लोक संतप्त आहेत.दुसरीकडे या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कुंदा मोरमारे यांच्या घरावर भलामोठा दगड येऊन पडला तसेच त्यांची मुलगी जखमी झाली.मात्र मुलीला वैद्यकीय मदत करायला देखील टाटा कंपनी कडून कोणी आले नाही.तसेच आता त्या 65 एकरातील पाणी साठवण तलाव बनविण्याचे काम जेमतेम 25-30 टक्के झाले आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तेथे सुरुंग स्फोट होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन या वाडीचे अन्य सुरक्षित ठिकाणी पुनवर्सन करावे अशी मागणी आदिवासी लोक सातत्याने करीत आहेत.मात्र आदिवासी लोकांच्या मागणीला केवळ वाटण्याच्या अक्षता दाखवण्याचे काम कंपनी प्रशासन करीत आहेत.
आकाश हिलम.. ग्रामस्थ
सतत होणारे सुरुंग स्फोट आणि रात्रभर चालणाऱ्या अवजड गाड्या यामुळे झोप येत नाही.त्यामुळे आमच्या गावाला धोका असून आमचे तत्काळ सुरक्षित जागी पुनर्सवन करावे..
कंपनीचे आश्वासन हवेत..
आतापर्यंत कंपनीने आमच्या घरांची मोजदाद घेतली आहे,घरांवर नंबर टाकले आहेत.पण एक एकर जमीन घेऊन आमच्या सर्व ग्रामस्थांना घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.आम्ही उपोषणात भाग घेतला पण आम्हाला घरे काही बांधून मिळाली नाहीत.अब्जावधीचे व्यवहार करणाऱ्या टाटा कंपनीला आदिवासी लोकांच्या घरासाठी एक एकर जमीन घेता येत नसल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घरांना तडे आणि घरांवर दगड येत असून येथे राहणारे आदिवासी कुटुंब धारक..
आकाश हिलम, संतोष शिद, दत्ता हिलम,मंगेश शीद, विलास शिद, दक्षता शिद,गुलाब वाघमारे,लहू शीद,अंकुश वाघमारे,रमेश शीद,विजय वाघमारे,महादू शीद,भगवान शीद,गंगाराम वाघमारे आदी.






