मिरारोड : काशीमिरा मध्ये शुक्रवारी एका दुकानात गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अनोळखी इसमाने प्लास्टिकच्या पिशवीतून बंदूक काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आहे. काशीमिरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदर आरोपीचा शोध घेत आहेत.
काशीमिरा नाक्यावर बेकिंग नावाचे केकचे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी १० च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती डोक्यात हेल्मेट घालून दुकानाच्या बाहेर बराच वेळ थांबून केक शॉप उघण्याची वाट पाहत होता. दुकान उघडल्यानंतर दुकानात शिरला आणि प्लास्टिकच्या पिशवीतून बंदूक काढून गोळीबार करण्याचं प्रयत्न केला. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देखील नव्हती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच, परिमंडळ – १ चे उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश तरडे, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती मोटारसायकल वरून आल्याचं समोर आले आहे. बंदूक रोखणाऱ्या सोबत एक व्यक्ती अजून होती. बंदुकीचा धाक दाखवून आरोपी मुंबईच्या दिशेने पसार झाले आहेत. पोलिसांकडून वेगवेगळी पथक तयार करण्यात आले असून संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत. ज्या व्यक्तींचे हे केक शॉपचे दुकान आहे ती व्यक्ती गुटखा माफिया असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे या घटनेची उलटसुलट चर्चा सुरू असून गुटखा, जमिनीचा वाद, दहशत पसरवणे असे अनेक तर्कवितर्क लावून पाहिले जात आहेत. नेमकं दहशद माजवण्याचा प्रयत्न की अजून काही वेगळं कारण हे पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरच समोर येईल. पोलिसांकडून सर्व बाबी तपासल्या जात आहेत.