खंबाटकी बोगदा चाचणीसाठी खुला; पुणे–सातारा प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित
या बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील धोकादायक वळणे, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे नुकसान यापासून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे. सुमारे साडेआठ किलोमीटरचा घाटरस्ता टाळता येणार असून, नव्या सहापदरी बोगद्यामुळे पुणे–सातारा प्रवासात किमान अर्धा तास वाचणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.
गेल्या काही वर्षांपासून खंबाटकी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या सहापदरी बोगद्याचे काम सुरू होते. आता बोगद्याचे सुमारे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०२६ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
नव्या बोगद्यात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात सुधारित प्रकाशयोजना, सीसीटीव्ही निगराणी, रुंद मार्गिका, परावर्तक चिन्हे आणि आपत्कालीन व्यवस्था यांचा समावेश आहे. जुन्या बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा अधिक रुंद आणि सुरक्षित असल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पामुळे पुणे आणि सातारा दरम्यान स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी हा घाट पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागत होती, मात्र आता बोगद्यातून हा प्रवास अवघ्या ५ ते १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
खंबाटकी घाट हा मुंबई–पुणे–बंगळुरू कॉरिडॉरमधील महत्त्वाचा दुवा आहे. हा मार्ग सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांना जोडतो. तसेच पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार यांसारख्या पर्यटनस्थळांसाठी आणि सज्जनगड, मांढरदेव, गोंदवले येथे जाणाऱ्या भाविकांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे.
दोन स्वतंत्र सहापदरी बोगदे
प्रत्येकी तीन मार्गिका
प्रवासाचा वेळ १५ ते २५ मिनिटांनी कमी
इंधन वापर, वाहन देखभाल खर्च आणि झीज कमी
अपघाताचा धोका घटणार
पुणे–बेळगाव, पाचगणी–महाबळेश्वर तसेच स्थानिक वाहतूक व पर्यटनासाठी उपयुक्त






