कास-ठोसेघरच्या डोंगररांगांत 'रानमेव्या'चा दरवळ! रानमेव्याची चव चाखण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Satara News : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सध्या रानमेव्याचा गोड सुगंध दरवळत असून कास पठार, ठोसेघर आणि घाटाई मंदिर परिसर रानमेव्याने बहरला आहे. कास–बामणोली परिसरासह पश्चिम घाटातील डोंगररांगांमध्ये विविध प्रकारचा रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.
आंबुळगी, तोरणे, करवंदे आणि जांभूळ यांसारख्या फळांनी जंगल परिसर समृद्ध झाला असून पर्यटक आणि स्थानिक नागरिक या रानमेव्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. उन्हाळ्यात सातारा–जावलीतील जंगलात फिरताना या रानमेव्याचा सुगंध पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
सातारा जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा शुभारंभ 1 मेपासून; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती
स्थानिक शेतकरी आणि नागरिक हा रानमेवा गोळा करून मेढा, सातारा शहर तसेच इतर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोतही मिळत आहे.
मात्र, यंदाच्या वाढत्या तापमानाचा परिणाम काही प्रमाणात जाणवत आहे. उष्णतेमुळे काही ठिकाणी झाडांचा मोहोर गळून पडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही उपलब्ध रानमेवा चव, पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्मांमुळे नागरिकांच्या पसंतीस उतरतो आहे.
रानमेवा हा केवळ चवीपुरता मर्यादित नसून त्यात अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. त्यामुळे ग्रामीण भागात त्याला विशेष महत्त्व आहे. सातारा–जावलीचा हा नैसर्गिक ठेवा पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याने त्याचे संवर्धन आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
यंदा लागलेल्या वनव्यांमुळे रानमेव्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे जळून नष्ट झाली असून ज्या ठिकाणी वनवा लागला नाही, तेथेच रानमेवा उपलब्ध आहे. त्यामुळे हा हंगाम मर्यादित काळासाठीच उपलब्ध राहणार आहे.
रानमेव्यामुळे जंगलातील पशुपक्ष्यांना अन्नाचा मोठा आधार मिळाला आहे. सकाळच्या वेळेस झाडांवर पक्ष्यांची मोठी गर्दी दिसून येत असून काही दिवस तरी त्यांच्या अन्नाची चिंता मिटली आहे.






