File Photo : Murder
चंदगड : पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून (Police Complaint) पोवाचीवाडी येथील पोलिस पाटील (Attack on Police Patil) यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पोलिस पाटलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील देवचारंगी नावाच्या शेतात घडली. यामुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली.
संदीप ज्ञानदेव पाटील (वय 41 रा. पोवाचीवाडी) असे मृत तरुण पोलिस पाटलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू असून, त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप यांना बोलावून घेतले. त्यानुसार, पोलिस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवचारंगी नावाच्या शेतात संशयित रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम व योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले. त्यात जुन्या वादात पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून कोयता व खुरप्याने हातावर, डोकीत व मानेवर सपासप वार करून ठार मारले.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुलगे, भाऊ, भावजय, असा परिवार आहे.
तक्रारीत नाव घातल्याचा राग
संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्च 2023 रोजी भांडण झाले होते. यामध्ये रोहित व भावकीतील काहीजणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये मयत पोलिस पाटील संदीप यानेच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून हा खून झाल्याचे घटनास्थळी बोलले जात असल्याचे समजते.