शिरोळ तालुक्यातील महापुरावर नियंत्रणासाठी आठ दिवसांत बैठक; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील वारंवार येणाऱ्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आठ दिवसांच्या आत बैठक घेण्याचे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जागतिक बँकेच्या ३२०० कोटी निधीतील शिरोळ तालुक्यासाठी कोणती कामे होणार याबाबत ठोस माहिती न मिळाल्यामुळे आणि आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात आंदोलन अंकुश संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
गेल्या वीस वर्षांत शिरोळ तालुका महापुराच्या विळख्यात आहे. २०१९ पासून केवळ पाच वर्षांत तीन वेळा महापुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे जनजीवन आणि शेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने या कालावधीत पूर नियंत्रणासाठी कोणताही ठोस निधी खर्च केला नाही. नुकसानभरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम ही अत्यल्प असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
जागतिक बँकेकडून महापुरावर नियंत्रणासाठी सरकारने ३२०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असले तरी त्यामधून शिरोळ तालुक्यातील उपाययोजनांचे चित्र अस्पष्ट आहे. सरकारकडून कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीसारख्या शहरी भागांना प्राधान्य देऊन १००० कोटींच्या गटारी योजनांचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शिरोळ तालुक्यात काय उपाययोजना होणार, याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही.
याबाबत आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले आदींची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी लवकरच बैठक घेऊन शिरोळ तालुक्याच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.