File Photo : ichalkaranji-municipal-corporation
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन महानगरपालिका म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेची ओळख आता वेगळ्याच अर्थाने घेतली जाणार आहे. लोकप्रतिनिधी-अधिकारी यांचा संघर्ष आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांना चांगलाच महागात पडला आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी पंगा घेतल्यानंतर दिवटे यांच्याकडील प्रशासकाचा कार्यभार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
ओमप्रकाश दिवटे यांना कार्यालयीन कामकाज करताना जिल्हाधिकाऱ्यांची सल्ला मसलत करावी लागणार आहे. त्यामुळे नाराज दिवटे दीर्घकालीन रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील प्रशासकपदाची जबाबदारी तत्काळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे देण्याबाबतचे आदेश उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी राज्यपालांच्या आदेशाने काढले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय सोयीसाठी ही नियुक्त केल्याचे नमूद असले, तरी या कारवाईच्या माध्यमातून माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिवटे यांचे पंख छाटल्याची चर्चा रंगली आहे.
महानगरपालिकेचे दुसरे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी 6 जुलै 2023 रोजी कार्यभार हाती घेतला. सुरुवातीपासूनच माजी आमदार आवाडे आणि आयुक्त दिवटे यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून आवाडे आणि दिवटे यांच्यात मोठा वाद झाला. आवाडे यांनी बहुतांशी प्रभागात शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभारले आहेत. याला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्याबरोबरच ते सुरू करण्यासाठी परवानगी आयुक्त दिवटे यांच्याकडून मिळत नव्हती.
आवाडे आणि दिवटे यांचा संघर्ष
हाच राग मनात धरून आवाडे यांचा दिवटे यांच्याशी संघर्ष सुरू झाला. त्यानंतर दिवटे यांच्या वर्षपूर्तीला अवघे काही दिवस बाकी असताना त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. त्या बदलीच्या विरोधात आयुक्त दिवटे यांनी प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्डाकडे धाव घेतली. त्यामुळे बदली रद्द होऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे महापालिकेचा कार्यभार कायम होता.
तसेच महापालिकांच्या निवडणुका न झाल्याने महापौरपदाच्या अधिकाराचे प्रशासकपदही आयुक्तांकडे होते. मात्र, त्यांच्याकडून तडकाफडकी प्रशासक हे पद काढून घेण्यात आल्याचा आदेश प्राप्त झाला. त्याजागी प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकपदाचा कार्यभार तातडीने स्वीकारावा आणि आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे, असेही शासन आदेशात नमूद केले आहे. या निर्णयामुळे यापुढे आयुक्त दिवटे यांना कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी लागणार आहे.
राज्यातील एकमेव प्रशासक जिल्हाधिकारी
राज्यातील 28 महापालिकांमध्ये आयुक्तांकडे प्रशासकपदाचा कार्यभार आहे. ते दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांकडील प्रशासकपदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. राज्यात 28 महानगरपालिका आयुक्त व प्रशासक ही दुहेरी जबाबदारी सांभाळत असताना एकमेव इचलकरंजी महापालिकेत आयुक्तांकडील प्रशासकाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल.
आवाडेंकडून दिवटेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’
माजी आमदार प्रकाश आवाडे व आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यात शहरातील काही निर्णयावरून संघर्ष होत होता. काही कायदा सोडून असणारी कामे दिवटे हे करण्यास तयार होत नव्हते, अशी चर्चा आहे. यातूनच आवाडे व दिवटे यांच्यात मनभेद निर्माण झाले आणि आवाडे यांनी सरकारी पातळीवरून दिवटे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दिवटे रजेवर जाण्याच्या तयारीत
प्रशासकपदाचा कार्यभार काढून घेतल्यानंतर ओमप्रकाश दिवटे नाराज झाले आहेत. ते महापालिकेत काम करण्यास उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळे ते रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवटे यांना आता प्रत्येक कामात जिल्हाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी लागणार आहे. त्यामुळे ते काहीसे निराश झाले आहेत. यातूनच त्यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.