या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजून आडवे पडले आहे, त्यांना पुन्हा कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडत आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असून शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत.
भातपीक हे कोकणातील एक प्रमुख पिक असून बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यांदेखत वाया जात असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले, संकटात सापडला, अन्याय झाला किंवा कर्जबाजारी असला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळे सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आलेलं आहे. परंतु यावेळची परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भात यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्य सरकारने दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच कापणीच्या वेळी आलेल्या वादळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीला चांगलचं झोडपलं. त्याशिवाय सांगायचं तर, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात देखील भातशेतीचं प्रचंड नुकसान पाहायला मिळालं. सिंधुदुर्ग जिल्यातील सावंडवाडी आणि वैभववाडी तालुक्यातील पावसामुळे कापणीला आलेलं भाताचं पिक भुईसपाट झालं आहे.






