ये झिपरे, आधी बापाला फोन लाव! ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या तरुणींना महिला कॉन्स्टेबलने भररस्त्यात बदडलं
लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने ट्रिपल सीट स्कुटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यात थांबवून चांगलंच धारेवर धरलं. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे मुलींचा निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यावरून संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे महिला कॉन्स्टेबलने भररस्त्यात केलेली शिवीगाळ व मारहाणीबद्दलही टीका होत आहे.
ही घटना लातूर शहरातील वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. तीन तरुणी एकाच दुचाकीवर बसून भरधाव वेगाने जात असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर काही अंतर त्यांच्या पाठलाग करून त्यांना थांबवण्यात आल्या. त्याचवेळी महिला कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि रस्त्यावरच तिन्ही तरुणींना बदडलं, शिवीगाळही केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
“जीव लई वर आला का?… रेस आहे का?… गाडी कशी चालवता, घरी सांगून आलात का?” अशा शब्दांत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिन्ही मुलींना रागाच्या भरात सुनावलं. मुली आपल्या चुकीची कबुली देत माफी मागताना दिसत आहेत, मात्र कॉन्स्टेबलचा राग अनावर झाला होता. “फोन लाव बापाला… आईचा नंबर दे…” असं म्हणत महिला कॉन्स्टेबल त्यांच्यावर चांगलीच संतापताना दिसत आहे.
हा संपूर्ण प्रकार जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात टिपून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे आणि या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी महिला कॉन्स्टेबलचं कृत्य गैर असल्याचं सांगत भररस्त्यात मुलींना मारहाण व अपमान करणं चुकीचं आहे, असं म्हटलं. तर काहींनी वाहतूक नियम तोडणाऱ्या मुलींवर कठोर कारवाई होणे गरजेचं असल्याचं मत नोंदवलं आहे.
मम्मी, मला मरायचं आहे, मी आता…; आईला व्हिडीओ पाठवून तरुणाची आत्महत्या
या घटनेनं वाहतूक शिस्त, पोलिसांची वागणूक आणि सोशल मीडियावरील जनमत या तिघांचाही अन्वय लावणारा नवा चर्चेचा विषय बनला आहे. यावर अधिकृत चौकशी होईल का? संबंधित महिला कॉन्स्टेबलवर कारवाई होईल का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.