सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, पत्ते उधळले; छावा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारीसुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, पत्ते उधळले; छावा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी
लातूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रचंड राडा पहायला मिळाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत थेट पत्रकार परिषदेतच राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पत्ते फेकून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे.
आज लातूरमध्ये सुनील तटकरे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी तटकरे यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर संताप व्यक्त करत “राजीनामा द्या” अशी मागणी करणारे निवेदन त्यांना दिलं. इतक्यावरच न थांबता, त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर टेबलावर थेट पत्ते फेकून घोषणाबाजी सुरू केली – “गेम खेळायचा असेल तर घरी खेळा!”, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
“सभागृह हे खेळाचं नव्हे, कायद्यासाठी आहे”
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं की, “कृषीमंत्री सभागृहात रम्मी खेळत असतील, तर अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.” त्यांनी सभागृहातील गैरवर्तनामुळे शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता दाखवणाऱ्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी जोरात लावून धरली.
निवेदनानंतर हाणामारी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण
निवेदन दिल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते रेस्ट हाऊसच्या बाहेर निघून जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांना जोरदार मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा हल्ला झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विजयकुमार घाडगे पाटील यांचा इशारा
या घटनेवर प्रतिक्रिया देताना विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले, “आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो. पत्ते खेळणारे कृषीमंत्री शेतकऱ्यांचं काय भलं करणार? पत्रकार परिषदेनंतर आम्ही दुसऱ्या खोलीत विश्रांती घेत होतो, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते – की गुंड? – तिथं आले आणि आमच्यावर हल्ला केला. सत्तेचा माज काय असतो, हे आज राष्ट्रवादीच्या वागणुकीतून दिसलं. छावा संघटनेत शेतकऱ्यांची पोरं आहेत, या सगळ्याचा हिशोब घेतला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.