सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर/ दीपक घाटगे : जोडा, तोडा, मोडा, आपला पक्ष वाढवा, अशी भूमिका घेतलेल्या भाजपने स्थानिक, प्रादेशिक पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोडून पक्ष वाढवण्याचे धोरण आखल्यामुळे स्वार्थी नेते, कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला जाऊन उभा राहू लागले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेसाठी व शेतकरी वर्गासाठी लढणाऱ्या संघटनातील नेते बाहेर पडल्याने नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे पक्ष कार्यरत होते. या सर्वच पक्षांच्या झेंड्याखाली काम करीत अनेक जण मोठे झाले. मात्र कालांतराने हेच नेते आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे मूळ पक्षाला सोडून अन्य पक्षात निघून गेले. त्यामुळे पक्षाचा प्रमुख संस्थापक अथवा नेता एकला चलो रे…अशी भूमिका घेऊन आज वाटचाल करत आहेत. याबाबत बोलायचे झाले तर नुकतेच शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेले शहर प्रमुख हर्षल सुर्वे दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करण्यास जमणार नाही, अशी भूमिका घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत दाखल झाले आहेत. तर यापूर्वी सुद्धा शिवसेनेची आमदार अशी ओळख असलेले राजेश क्षीरसागर सुद्धा पक्ष सोडून गेले आहेत.
मूळ पक्ष साेडून अन्य पक्षात उडी
काँग्रेस पक्षातून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक शारंगधर देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम केला. यातून सतेज पाटील यांना जिल्ह्यात एकाकी पाडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा अशीच पडझड झाली असून, अनेकांनी स्वार्थापोटी मूळ पक्ष सोडून अन्य पक्षात उड्या मारल्या आहेत, तर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खाली ठेवला आहे.
स्वाभीमानीचे नेते भाजपच्या मांडवात
शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा, म्हणून निर्माण झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उगम शिरोळ तालुक्यातून झाला. त्यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, आमदार सदाभाऊ खोत, सावकर मादनाईक, जालंदर पाटील, राजेंद्र गडण्यावार, भगवान काटे, शिवाजी माने आदी कार्यरत होते. या पक्षाचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतीमालाला भाव मिळावा, यासाठी जोरदार आंदोलने केली. त्यामुळे ऊसाला योग्य दर मिळाला, मात्र कालांतराने या संघटनेत फूट पाडून भाजपने नेत्यांना आपल्याकडे खेचले. आज सावकर मादनाईक भाजपमध्ये गेले असली तरी शेतकऱ्यांच्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते अन्य पक्षाच्या रिंगणात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची असलेली चळवळ भविष्यात टिकून राहणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
स्वार्थी राजकारण कधी संपणार?
शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, यासाठी शेट्टी यांनी नुकतेच राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. या आंदोलनाचे फलित मिळो अथवा न मिळो मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. पक्षात कार्यकर्ता नेता होतो, नेता झाला की कॉलर ताट होते. आणि त्याला सत्तेची स्वप्ने पडू लागतात. मात्र ज्या ठिकाणी आपण काम केले त्या पक्षाचा त्यांना विसर पडतो आणि जय महाराष्ट्र करत अन्य पक्षात जातात. यालाच म्हणतात राजनीती आणि स्वार्थी राजकारण हे कधी संपणार आहे.