अमरावती : जिल्हा परिषदेसह (Zilla Parishad) तहसील स्तरावर (Tehsil level) जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमध्ये सर्कल निहाय आरक्षण सोडत गुरवारी पार पडली. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघाच्या तुलनेत पंचायत समितीचे २ गण या प्रमाणे सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने १३२ जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेप्रमाणेच ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) झालेल्या या सोडतीमुळे कही खुशी, कही गम चे चित्र दिसून आले. अनेक दिग्गजांना या सोडतीमुळे फटका बसणार असून काहींना अनपेक्षीत लॉटरी लागल्याचे देखील दिसून येत आहे.
तालुक्यातील बारा पंचायत समिती (Panchayat Committee) सर्कल करीता जातीनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात (Tehsil Office) काढण्यात आली. यामध्ये ६ सर्कल महिलांकारिता राखीव झाले. या आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड झाला असून काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तालुक्यातील बारा सर्कल मधील राजुरा बाजार पं.स. सर्कल हे नामाप्र महिलांकरिता राखीव झाले. सातनूर पं.स. सर्कल अ.जा. महिला, शहापूर पं.स. सर्कल नामाप्र, करजगाव पं.स. सर्कल अनुसूचित जमाती महिला, हातुर्णा पं.स. सर्कल अनुसूचित जाती, लोणी पं.स. सर्कल अनुसूचित जमाती, पुसला पं.स. सर्कल सर्वसाधारण महिला, आमनेर पं.स. सर्कल सर्वसाधारण, सावंगी पं.स. सर्कल सर्वसाधारण, टेंभुरखेड पं.स. सर्कल सर्वसाधारण, जरूड पं.स. सर्कल सर्वसाधारण महिला, बेनोडा शहीद पं.स. सर्कल सर्वसाधारण महिला या प्रवर्गकारिता राखीव झाले आहे.
रियान रजिक काझी आणि जान्हवी उत्तमराव काइरे या चिमुकल्यांनी आरक्षणाच्या चिठ्या काढल्या. यावेळी तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, निवडणूक विभागातील कर्मचारी आदी उपस्थित होते.