PM vima Yojana: विमा कंपनीवरील चुकीच्या आक्षेपांवर कायदेशीर कारवाई होणार; अर्ज दुरुस्तीसाठी देणार शेतकऱ्यांना संधी (फोटो - istockphoto)
या बैठकीस संबंधित पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हास्तरीय आढावा समिती व तक्रार निवारण समितीचे सदस्य, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधी व कृषीचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप २०२५ हंगामातील अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये पीक विमा अर्ज स्वीकृती, पात्रता व अपात्रता, विमा कंपनीकडून घेण्यात आलेले आक्षेप व शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी यावर चर्चा करण्यात आली.
विमा कंपनीमार्फत विविध कारणांमुळे रिव्हर्ट (परत) आलेल्या पीकविमा अर्जाबाबतही चर्चा करण्यात आली. याअनुषंगाने जिल्हाधिकारी पूजार यानी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना स्पष्ट निर्देश दिले की, शेतकऱ्यांचे रिव्हर्ट झालेले अर्ज तातडीने तपासून आवश्यक पूर्तता करून ते विहित कालमर्यादेत पुन्हा सादर करावेत. केवळ तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित राहू नयेत अथवा अपात्र ठरू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रतिनिधींना देण्यात आले.
जिल्हास्तरीय आढावा समितीच्या बैठकीत सुकाणू समितीने यापूर्वी घेतलेल्या निर्णयांवर चर्चा करण्यात येऊन ते निर्णय जिल्हास्तरीय समितीने कायम ठेवले. छाननीदरम्यान विमा कंपनीकडून चुकीचे किंवा अन्यायकारक आक्षेप घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित विमा
कंपनीविरुद्ध प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी पूजार यांनी दिले. रद्द करण्यात आलेल्या अर्जाची त्रुटीपूर्तता करून संबंधित अर्जदारांना नोंदविण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.






