संतोष बांगर यांच्या प्रयत्नांमुळे हिंगोलीमध्ये भाजप पराभव तर शिवसेना विजयी झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मकरंद बांगर : हिंगोली : हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा केवळ एका नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. मुख्यमंत्री पातळीवरील सभा, वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती, मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेली प्रचारयंत्रणा असूनही भाजपला या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागले. याउलट शिवसेनेने शिस्तबद्ध संघटन, काटेकोर नियोजन आणि तळागाळातील कामाच्या जोरावर निर्णायक विजय मिळवला.
निकालाची आकडेवारीच भाजपच्या अपयशाचे वास्तव अधोरेखित करते. शिवसेनेच्या उमेदवारांना एकूण २३ हजार ४८५ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवारांना केवळ १२ हजार ६६३ मते मिळू शकली. तब्बल १० हजार ४३६ मतांचे अंतर हे सामान्य नसून, हा जनतेचा स्पष्ट कौल मानला जात आहे. १७प्रभागांपैकी १२ प्रभागांत शिवसेनेने आघाडी घेत भाजपला बहुसंख्य प्रभागांत पिछाडीवर टाकले.
भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून मुख्यमंत्र्यांची सभा घेतली होती. मात्र सभा होऊनही मतांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. मोठ्या व्यासपीठावरून केलेले भाषण, घोषणाबाजी आणि प्रचाराचा गाजावाजा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकला नाही, हे निकालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपच्या प्रचारपद्धतीवर आणि स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे देखील वाचा : नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत
समन्वयाचा अभाव
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजपच्या अनेक नेत्यांनी कागदावर मांडलेली राजकीय गणिते प्रत्यक्ष मतदानात पूर्णपणे फसली. प्रभागनिहाय वास्तव, स्थानिक नाराजी आणि कार्यकत्यांमधील समन्ययाचा अभाव याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका भाजपला बसला. केवळ वरिष्ठ नेत्यांच्या सभांवर अवलंबून राहिल्याने तळागाळातील मतदार जोडण्यात अपयश आले. याउलट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यानी ही निवडणूक संघटनात्मक ताकदीच्या जोरावर लढवली.
हे देखील वाचा : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र अभ्यास, सामाजिक समीकरणांचा आढावा, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि कार्यक्षम उमेदवारांची निवड करण्यात आली. प्रचारातही केवळ भाषणांवर न थांबता घराघरात पोहोचणारा थेट संवाद, कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चिती आणि सातत्यपूर्ण संपर्क यावर भर देण्यात आला. संतोष बांगर यांनी संपूर्ण प्रचारकाळात स्वतः मैदानात उत्तरून प्रत्येक प्रभागावर लक्ष केंद्रित केले. कार्यकत्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, नाराज घटकांना समजावून घेणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नियंत्रण ठेवणे, हे त्यांचे संघटन कौशल्य ठळकपणे दिसून आले. याचाच परिणाम म्हणजे शहरातील विविध प्रभागांत शिवसेनेला सातत्यपूर्ण मताधिक्य मिळाले.
फेरबांधणीची गरज
राजकीय विश्लेषकाच्या मते, या निकालाने स्पष्ट संदेश दिला आहे की केवळ सत्ता, मोठी नावे किवा सभा ठरत नाहीत. मजबूत विश्वास आणि तळागाळातील काम याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा असून, संघटनात्मक फेरबांधणीची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे. एकूणच हिंगोली नगर परिषदेचा निकाल हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात असून, शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि संतोष बांगर यांच्या नेतृत्वाचा ठोस पुरावा म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे.






