'आपले सरकार' पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही! (Photo Credit- X)
याहूनही गंभीर बाब म्हणजे, पोर्टलवर प्रामुख्याने खेडेगावांचा किंवा ग्रामपंचायत नोंदणीतील गावांचा उल्लेख दिसून येतो; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका/नगरपरिषद) शहरांचा उल्लेख आढळत नाही. याचे उदाहरण म्हणजे महाबळेश्वरसह पाचगणी या दोन्ही महत्त्वाच्या पर्यटन शहरांचा पोर्टलवर उल्लेख दिसत नाही. पोर्टलवरील अनेक गावांची नावे चुकीच्या स्पेलिंगमुळे वेगवेगळ्या प्रकारे नोंदवली गेल्याने तीच गावे दुबार दिसत आहेत. उदाहरणार्थ, “क्षेत्र महाबळेश्वर” व “क्षेत्रमहाबळेश्वर”, “मेट तळीये” व “मेट तळे”, “कुंभरोशी” व “कुंभ्रोशी” तसेच “खिंगर” व “खेंगर” अशी नावे स्वतंत्रपणे दिसत असून, यामुळे तक्रार नोंदवताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेपरंतु, दुसरीकडे तालुका म्हणून महाबळेश्वरचा उल्लेख आहे परंतू त्यानंतर महाबळेश्वर किंवा त्याचे महसुली नाव ‘माल्कम पेठ’ यांचा साधा उल्लेखही पोर्टलवर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महाबळेश्वर परिसर हा इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित असतानाही, पर्यावरणाशी संबंधित विविध समस्यांची (अतिक्रमण, वृक्षतोड, प्रदूषण इ.) नोंद करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा पर्याय या पोर्टलवर उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली आहे. शहरातील तक्रारी पालिकेकडे केल्या जातात परंतू त्याची दखल घेतली नाही तर तक्रार कोठे करणार असा प्रश्न नागरिकांना व पर्यटकांना पडत आहे. तसेच पालिकेकडे ऑनलाइन तक्रार करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या अनेक तक्रारी दाखल करण्यासाठी व्यासपीठच नसल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या वाढत्या पर्यटनामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन तक्रारीची व्यवस्था निर्माण केली पाहिजे अशी मागणी अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे या संवेदनशील भागातील तक्रारी योग्य पद्धतीने नोंदवता येतील व त्याचे निरसन देखील होण्याची शक्यता वाढेल अशी नागरिकांकडून मागणी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, इतर शहरांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध असताना महाबळेश्वर आणि पाचगणीसारख्या पर्यटनदृष्ट्या तसेच पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना इतर विभागांचा पर्याय निवडावा लागत असून, त्यामुळे तक्रारींचे योग्य निवारण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
यासंदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पोर्टलमधील स्पेलिंग चुका दुरुस्त कराव्यात, दुबार नोंदी हटवाव्यात तसेच महाबळेश्वर/माल्कम पेठ व पाचगणीसाठी स्वतंत्र श्रेणी उपलब्ध करून द्यावी. याचबरोबर, इको-सेन्सिटिव्ह झोनमधील समस्यांसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणीची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने याबाबत विचार करुन आवश्यक ती सोय उपलब्ध करुन द्यावी व तांत्रिक त्रुटी असल्यास ती तातडीने दूर करण्यात येईल, अशी मागणी व्यक्त केली जात आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर देण्यात आलेला नंबर किंवा ईमेल हे अनेकवेळा चुकीचे किंवा त्यावर संपर्क होत नाही. काही ठिकाणी संपर्क झाला किंवा चुकीची माहिती मिळाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारींचा फॉलोअप घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने याबाबत देखील सुधारणा करणे गरजेचे आहे असे मत अनेकांनी व्यक्त केली आहे.






