राज ठाकरे यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान, म्हणाले, मनसेसोबत सध्या कोणताही...
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. त्यापार्श्वभूमीवर आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पक्षाचे धोरण आणि विचारसरणी यामध्ये कोणताही बदल नाही आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत काँग्रेसचा सध्या कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीबाबत तसेच पुढील तीन महिन्यांच्या राजकीय कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, “पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी आम्ही रणनीती आखली असून येणाऱ्या महिन्यांसाठीचा कार्यक्रम कॅलेंडर निश्चित केलं आहे. बैठकीत सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपली मते मांडली असून कार्यपद्धतीबाबत व्यापक चर्चा झाली.”
राजकीय आघाडीबाबत विचारले असता सपकाळ म्हणाले, “आम्ही आधीच ठरवले आहे की, कोणत्याही आघाडीबाबत निर्णय स्थानिक युनिट घेईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतले जातील.”
राज ठाकरे यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध आहे का, असा सवाल विचारण्यात आला असता सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितले, “राज ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये आजअखेर कोणताही संबंध नाही. आम्ही भारतीय संविधानाचे पालन करणारे पक्ष आहोत. संविधानाच्या आठव्या परिशिष्टात नमूद २२ भाषांचा आम्ही सन्मान करतो. आमचा दृष्टिकोन समावेशक आहे. आमची विचारधारा सर्वसमावेशक असून आम्ही तिच्यावर निष्ठेने काम करत आहोत.”
या दरम्यान, काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, “७ जुलै रोजी मुंबईत राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार असून त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात अंतिम रणनीती ठरवण्यात येईल.”
राज ठाकरे यांच्याबाबत विचारले असता चेन्निथला म्हणाले, “राज ठाकरे हे उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतात, अशा विचारांशी काँग्रेस सहमत नाही. आमच्यासाठी भारत एकसंध आहे – उत्तर-दक्षिण भेदाभेद न करता आम्ही सर्व भारतीयांना समान अधिकार आणि संधी देण्यावर विश्वास ठेवतो.” या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना चेन्निथला म्हणाले, “आत्ताच्या घडीला काहीही निश्चित नाही. कुठलीही आघाडी किंवा युती ही परिस्थितीनुसार ठरणार आहे. आम्ही सध्या त्या दिशेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.”
राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोबत येण्याचे संकेत दिले असताना काँग्रेसकडून यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, काँग्रेसने आपली विचारसरणी स्पष्टपणे मांडताना, मनसेच्या भाषावादी आणि विभागीय राजकारणाला पाठिंबा नसल्याचे दाखवून दिले आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ‘महा विकास आघाडी’च्या स्वरूपात काँग्रेसची भूमिका काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.