BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? (photo Credit- X)
मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीने काम करत नसून हा लोकशाहीचा अपमान आहे,” असे ठाकरे यांनी म्हटले.
यावर स्पष्टीकरण देताना राज्य निवडणूक आयोगाने म्हटले की, २०११ पासून कोरेस कंपनीची मार्कर शाई वापरली जात आहे. शाई सुकण्यास काही वेळ लागतो. जे लोक मुद्दाम शाई पुसण्याचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्यांची चौकशी केली जाईल.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या वादाला अधिक धार दिली. त्यांनी स्वतःच्या बोटावरील शाई ‘एसीटोन’ने पुसतानाचा व्हिडिओ पोस्ट करत आयोगाला सवाल केला. “मतदान केंद्रावर शाई सहज पुसली जात आहे, मतदारांची नावे गायब आहेत आणि पैशांचा सर्रास वापर सुरू आहे. निवडणूक आयोग आपली जबाबदारी का झटकत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधारी पक्षांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आतापासूनच पराभव स्वीकारला आहे. पराभवाच्या धास्तीने ते वैफल्यग्रस्त झाले असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पत्रकार परिषदा घेत आहेत. तर, “उद्धव ठाकरेंना स्वतःचा पराभव स्पष्ट दिसत आहे. उद्या निकाल लागल्यानंतर मुंबई सिंगापूरला चोख उत्तर देईल, असे रडगाणे ते पुन्हा गातील. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आता मोजकेच दिवस उरले आहेत.”
आज राज्यातील २९ महापालिकांसाठी सरासरी ४२ ते ४८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबईत मतदानाचा टक्का काहीसा घसरला असला, तरी कोल्हापूर आणि परभणीमध्ये मतदारांनी विक्रमी नोंद केली आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
‘जनमत’च्या एक्झिट पोलनुसार मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता येताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसनेच्या मिळून 138 जागा निवडणून येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व शरद पवार यांच्या यांच्या आघाडीला 62 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कॉँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 20 जागा मिळू शकतात. दरम्यान ही आकडेवारी एक्झिट पोलचे आकडे असून खरे आकडेवारी नाही. बहुमत कोणाच्या बाजूने येणार हे उद्याच्या निकालामधूनच स्पष्ट होणार आहे.






