मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गडचिरोली जिल्ह्यातील माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची नियुक्ती केली आहे. डॉ. नामदेव उसेंडी यांचे M.B.B.S, M.D. शिक्षण झाले असून काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांनी विविध पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.
सध्या ते प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. २००९ ते २०१४ दरम्यान ते विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आले होते. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. २०१४ ते २०२१ पर्यंत ते गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. १९९४ ते १९९७ दरम्यान त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेचे ते संस्थापक चेअरमन होते. आदिवासी मदिआ समाज सुधार संस्था जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
[read_also content=”महावितरणचा अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले https://www.navarashtra.com/maharashtra/mahavitran-officer-in-anti-corruption-net-he-was-caught-red-handed-while-accepting-a-bribe-of-fifteen-thousand-rupees-nrdm-330443.html”]
महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. पक्षाने माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून आदिवासी समाजासाठी कार्य करू तसेच काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करेन, असे डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे.