राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता (फोटो सौजन्य - istockphoto)
राज्यात जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आता पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील 3 ते 4 विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहान प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- महायुती सरकारच्या भूमिकेला न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; मंत्री विखेंनी मानले आभार
महाराष्ट्रातील हवामानबाबत पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के एस. होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी सांगितलं आहे की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या तीन- चार दिवसांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 15 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. उद्या 16 ऑगस्ट रोजी देखील राज्य्यातील हवामान कोरडे राहिल असा अंदाज आहे. मात्र शनिवारपासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये शनिवारी 17 ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी 18 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या 6 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेदेखील वाचा- 30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून झाला वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट
पश्चिम हिमालय प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतासह इतर भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच हरियाणा, राजस्थान आणि ईशान्य भारतात पुढील पाऊस दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. केरळ, तामिळनाडू, दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि रायलसीमा या भागांत पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर जम्मू-काश्मीर, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठवडाभर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.