काळजी घ्या ! उन्हाचा कडाका आणखी वाढणार; 16-17 एप्रिलला उष्णतेची लाट येणार (फोटो - istock)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. राज्यातील नागरिकांना भयंकर उकाड्याचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता पुणे जिल्ह्यात १६ व १७ एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा येथील भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. तापमानात वाढ होत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरही दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ व १७ एप्रिल रोजी तापमानात लक्षणीय वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदविले जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते सायंकाळी ४ दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे, डोके झाकण्यासाठी टोपी किंवा रुमाल वापरणे तसेच थेट सूर्यप्रकाशापासून दूर राहणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकरी, मजूर आणि बाहेरील काम करणाऱ्या व्यक्तींनी कामाचे वेळापत्रक सकाळी किंवा सायंकाळी ठेवावे, असेही प्रशासनाने सूचविले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, एप्रिलमध्ये असे तर मे मध्ये कसे असा प्रश्न नागरिकाना पडला आहे.
अकोला ठरले सर्वात उष्ण शहर
दुसरीकडे, विशेषतः विदर्भात तर सूर्य चांगलाच कोपला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक अकोल्यामध्ये तापमानची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अकोला तापले होते. विशेष म्हणजे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. तर देशात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे.
Mumbai Weather : पुन्हा उष्णतेचा कहर! अनेक ठिकाणी पारा 40 अंशांपलीकडे, हवामान विभागाचा इशारा






