नाणेघाटात दरीत कोसळून एकाचा मृत्यू (फोटो- टीम नवराष्ट्र)
बेपत्ता युवकाची डोंगरावर अर्धवट ठिकाणी एक चप्पल सापडली . तसेच दरीत घसरल्याच्या खुणा दिसल्याने तो युवक पावसामध्ये पाय घसरून दरीत पडला असण्याची दाट शक्यता वाटली. घटनास्थळी आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी थर्मल ड्रोन द्वारे या ठिकाणी पाहणी केली असता पाऊस वारा व धुके यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.
दि. २१ सकाळी पुन्हा शोधमोहीम मुरबाडच्या दिशेने चालू केली असता मुरबाड येथील दीपक विशे यांच्या सह्यगिरी रेस्क्यू टीमच्या कुसुम विशे, संदेश गपाट, हेमंत ठोंबरे, रामदास ठोंबरे, मारुती वाघ, हरि लोबी, समीर ठोंबरे यांनी सुमारे साडे तीन तास अथक प्रयत्न करून सकाळी ९.३० च्या सुमारास युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळविले. दरम्यान पर्यटकांनी अशा परिसरात जाताना सतर्कता बाळगण्याचे व घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
मुरबाड जि.ठाणे येथील सह्यगिरी रेस्क्यु टीमने या वर्षभरात दहा बचाव कार्य केले असून त्यापैकी सहा बचाव कार्यामध्ये मृतदेह शोधून काढले आहेत.हे मृतदेह २० ते २५ वयोगटातील आहेत तरुणांनी फिरायला जाताना मद्यप्राशन करू नये, तसेच नको धाडसही करू नये असे आवाहन सहयगिरी रेस्क्यू टीमचे दीपक विशे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी यांनी केले आहे.






