File Photo : Election Victory
वाई : वाई विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील ६१,३९२ मताधिक्याने विजयी चौकार लगावला. त्यांना १,४०,९७१ मते मिळाली, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अरुणादेवी पिसाळ यांना ७९५७९ मते मिळाली. तर माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना अवघी ४६९५ मते मिळाली. मकरंद पाटील यांनी सलग २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या निवडणुकीत आपले विजयी मताधिक्य चढते ठेवण्यात यावेळीही यशस्वी झाले.फटाक्यांच्या आतिषबाजी गुलालाची उधळण करीत आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्र वखार महामंडळाच्या जागेत मतमोजणीस सुरुवात
सकाळी आठ वाजता वाई एमआयडीसी वाई येथील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या जागेत मतमोजणीस सुरुवात झाली. दुपारी २ पर्यंत शेवटचा निकाल हाती आला. मतमोजणीत पहिला फेरीपासूनच आमदार मकरंद पाटील यांनी आघाडी घेतली होती. सहाव्या फेरी अखेर आमदार पाटील यांनी १०३५० मतांची आघाडी घेतली. सातव्या फेरी अखेर खंडाळा तालुक्यातील मतमोजणी संपली खंडाळा तालुक्याने मकरंद पाटील यांना १०७४३ मतांची आघाडी दिली.आ. मकरंद पाटील यांना ४३३९२ तर सौ. अरुणादेवी पिसाळ यांना ३२६४९ मते मिळाली.स्थानिक अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना २३६८, अपक्ष गणेश केसकर यांना २०८६ मते देऊन हंगामी उमेदवारी करणाऱ्याना खंडाळ्याच्या जनतेने स्पष्टपणे नाकारले.
वाई तालुक्याची मतमोजणीस सुरुवात
आठव्या फेरीपासून वाई तालुक्याची मतमोजणीस सुरुवात झाली आठव्या फेरीत आ. पाटील यांनी १४२३७ मताधिक्य घेतले तर नवव्या फेरी अखेर १९१५७ मताधिक्य घेतले. पंधराव्या फेरीअखेर आ. पाटील यांनी निर्णायक मताधिक्य घेत ४६६११ मतांची आघाडी घेतली होती. तर सोळाव्या फेरीत ५०२७२ मतांचे मताधिक्य घेत विजयावर शिक्कामोरतब केले. सतराव्या फेरीत बावधन गटाच्या मतमोजणीमध्ये मकरंद पाटील यांचे मताधिक्य २००० मतांनी कमी झाले. मात्र, अठराव्या फेरीत पुन्हा मताधिक्याची घोडदौड कायम ठेवत पाटील यांनी ५१३१२ मतांची आघाडी घेतली. विसाव्या फेरी अखेर ५४१६४ तर चोवीसाव्या फेरीत ६०८७२ चे मताधिक्य घेतले.पोस्टल मतदानातील ११२२ मते आ. पाटील यांना पडली,अरुणादेवी पिसाळ यांना ९६६, पुरुषोत्तम जाधव ५३ मते मिळाली. आ. पाटील यांना एकूण ६१३९२ मतांची आघाडी घेत विजयी झाले.
महायुतीच्या उमेदवारांना मिळाली मते
राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांना १ लाख ४० हजार ९७१ मते मिळाली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अरुणादेवी पिसाळ ७९ हजार ५७९ मते पडली. खंडाळाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना केवळ ४६९५ तर दुसरे अपक्ष उमेदवार गणेश केसकर यांना २३०१ मते मिळाली. याव्यतिरिक्त एकही उमेदवार चार आकडी मतांचा आकडा गाठू शकला नाही. नोटा १७८६ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता पुरुषोत्तम जाधव यांच्यासह इतर सर्व उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली.विजयी उमेदवार आ.पाटील यांना केंद्रीय मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हुसेन यांच्या हस्ते व निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या उपस्थितीत विजय प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी
खासदार नितीन पाटील, प्रतापराव पवार, राजेंद्र राजपुरे, राजेंद्र तांबे व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. मकरंद पाटीलच या मतदारसंघात विजयी चौकार लगावणार याची कार्यकर्ते व समर्थकांना खात्री असल्याने कार्यकर्त्यांनी निकालाआधीच गावागावातील मुख्य चौकात आबांच्या विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावून ठेवले होते. मकरंद आबा प्रत्येक फेरीत आघाडी घेत असल्याने त्यांच्या समर्थकांनी गावोगावी फटाक्यांची अतिषबाजी करत गुलालाची उधळण।करीत विजयोत्सव साजरा करत होते.आबा विजयी झाल्याचे जाहीर होताच गुलालाची उधळण करीत, मकरंद पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. सायंकाळी उत्साही कार्यकर्त्यांनी पाटील यांची शहरातून डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत जल्लोषात विजयी मिरवणूक काढली.