फोटो - टीम नवराष्ट्र
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये देखील मराठा आरक्षण हा मुद्दा गाजणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 सप्टेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यापूर्वी आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषण आणि विधानसभा निवडणूका लढवणा असा निर्धार जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
अब्दूल सत्तार आले भेटीला…
मराठा आरक्षणासाठी आता जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील संकटमोचक म्हणून मंत्री अब्दूल सत्तार पुढे आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आरक्षणासह त्यांनी राज्यातील विविध विषयांवर मनोज जरांगे पाटील व अब्दुल सत्तार यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल 3 तास चर्चा झाली. अब्दूल सत्तार यांनी या चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मांडली. “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवर चर्चा
त्याचबरोबर आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील व फडणवीस यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले,”पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करताना मी सांगितले होते की याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो. फडणवीस साहेबांचा फोन आला होता. फडणवीस साहेबांना सांगितले की तुम्हाला शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागले. ते म्हणाले उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहोत तेथे निर्णय घेतो,” अशी चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता
यापूर्वी अनेक बैठकीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्प फडणवीस यांच्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. फडणवीस यांचा अनेकदा एकेरी उल्लेख करत आरक्षण कसे देत नाही म्हणत थेट चॅलेंज दिले होते. यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री अब्दूल सत्तार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांची देखील भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांची मागणी आणि म्हणणे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवले आहे.