सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक असणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक, माजी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह वीस माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्वजण मुंबईत प्रवेश करणार आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या काँग्रेसच्या सत्ता काळात शारंगधर देशमुख यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत कारभारी म्हणून भूमिका निभावली होती. यादरम्यान त्यांनी स्थायी समितीचे सभापती पदही भूषविले होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी त्यांनी मागितली होती. त्यांना डावलून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे आमदार सतेज पाटील आणि शारंगधर देशमुख यांच्यात एक प्रकारे दरी निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रचंड नाराजी होती याचा फटका विधानसभा निवडणुकीत होऊन काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर शारंगधर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी सलगी वाढवली होती. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासोबत माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अशपाक आजरेकर यांच्यासह वीस माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत एका हॉटेलमध्ये हा प्रवेश होणार असल्याने यासाठी कोल्हापुरातून हे सर्वजण आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले आहेत.
शारंगधर देशमुख यांच्यासह माजी महापौर प्रतिभा नाईक नवरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, अभिजीत चव्हाण, रीना कांबळे, तात्या खेडकर, गीता गुरव, अश्विनी बारामती, सचिन मोहिते, सुनंदा मोहिते, संभाजी जाधव, संगीता सावंत, पूजा नाईक नवरे, रेखा पाटील, जहांगीर पंडित, भरत लोखंडे, रशीद बालगीते हे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
यांच्याबरोबरच अभिजीत खतकर, किरण पाटील, इस्माईल बागवान, कुलदीप सावतकर, अश्किन आजरेकर, अश्फाक आजरेकर ,विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, उपाध्यक्ष अशितोष मगर, दक्षिण कार्याध्यक्ष विवेक भोसले, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुजय चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सतेज पाटील गटाबरोबरच खासदार धनंजय महाडिक यांच्या गटालाही जोरदार धक्का बसला आहे. महाडिक यांच्या जवळचे नातेवाईक असलेल्या सत्यजित कदम यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्याने महाडिक गटाला धक्का बसला होता. आता भाजप आणि ताराराणी आघाडीतील कदम समर्थक माजी नगरसेवक हेसुद्धा प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी मागील आठ दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अनेक जण पक्षप्रवेशाच्या यादीत जाऊन बसले आहेत. एकंदरीत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला आपली सत्ता आणायची असून यासाठी आत्तापासून कंबर कसली आहे. राज्यात महायुतीची सत्ता असली तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना फोडण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू झाले आहे.