बारामती: नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे अनेकांना हार्ट अटॅक येत आहेत, यामध्ये काहींचा मृत्यू देखील झाला आहे, ही जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे, मात्र केंद्र सरकार हात झटकत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
बारामती शहरातील डेंगळे गार्डन या ठिकाणी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने ओबीसी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी आमदार रामहरी रुपनवर, ओबीसी महिला विभाग जिल्हाध्यक्ष किरण कळभोर, काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे सुनील शिंदे, देविदास भन्साळी, नंदकुमार कुंभार , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर , जसा भाई मोटवानी , पुणे जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग राजाभाऊ बरकडे , बारामती शहर अध्यक्ष अशोक इंगोले, बारामती तालुका अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर , प्रदेश सचिव आकाश मोरे , प्रदेश सदस्य अॅड.इनक्लाब शेख , उपाध्यक्ष युवक काँग्रेस पुणे जिल्हा सुरज भोसले , शहराध्यक्ष युवक काँग्रेस योगेश महाडिक , पुणे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी विभाग, अॅड. बिलाल बागवान अॅड. स्वरूप सोनवणे , सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग राजाभाऊ रुपनवर , विजय राऊत नाशिक , पांडुरंग कुंभार उस्मानाबाद , शंभू म्हात्रे पनवेल , दिगंबर राऊतआदी सह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पटोले म्हणाले, सध्या महाराष्ट्रासह देशांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र मूळ प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी नवे वाद निर्माण केले जात आहेत. कोरोना मध्ये दिलेल्या लसीमुळे अनेक दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागत आहेत. यामध्ये काहींचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आहे. मात्र ही जबाबदारी केंद्र सरकार ने घेण्याची आवश्यकता असताना केंद्र सरकार जबाबदारी टाळत आहे. जनतेच्या जीविताची जबाबदारी सरकारची आहे. लसीकरणाच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधानांचा फोटो देण्यात आला होता. त्यामुळे जबाबदारी केंद्राने स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. ओबीसींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची एकजूट आवश्यक आहे. सध्या संविधान धोक्यात आहे.२०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजप सत्तेवर आल्यास कदाचित ही निवडणूक शेवटची ठरेल, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला.
धर्माच्या नावाखाली ओबीसींना लुटण्याचे काम सुरू असल्याचे सांगून पटोले म्हणाले, भगवान श्रीराम आमचे देखील आहेत, मात्र त्यांचे मंदिर बांधण्यासाठी गोळा केलेल्या लोक वर्गणीचा हिशोब दिला जात नाही. आगामी काळामध्ये ओबीसीसह बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपण ताकद देणार असल्याचे सांगून बारामती मध्ये बारामतीला शोभेल अशी काँग्रेस कार्यालयाची इमारत बांधली जाईल असे आश्वासन पटोले यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी आमदार संजय जगताप यांनी ओबीसी समाजाने संघटीत होण्याची गरज असल्याचे सांगितले. भानुदास माळी यांनी काँग्रेसच्या विचारांची देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविक रोहित बनकर यांनी यावेळी केले.
बारामतीच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान
नाना पटोले यांनी बारामतीच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे सांगून ते म्हणाले, बारामतीच्या काँग्रेस कमिटीचा इतिहास पाहिला तर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी यांच्यासह देशातील तसेच राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत. या ठिकाणी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते घडले. त्यामुळे बारामती मधील काँग्रेस कमिटी कार्यालयाची नवीन इमारत बारामतीच्या विकासाला शोभेल अशी बांधली जाईल. येत्या वर्षभरात ही इमारत बांधली जाईल. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल.