राज्य सरकारने काढला मराठा आरक्षणाचा जीआर
मराठा आरक्षणाच्या जीआरविरुद्ध ओबीसी नेते आक्रमक
आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन उभे कळे होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आरक्षणचा जीआर काढला आहे. मात्र या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे मराठा समाजाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने उच्च न्यायालयात कॅवेट दाखल करण्यात आली. अॅड. अतुल पाटील यांनी ही कॅवेट दाखल केली असून, ‘आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयाविरुद्ध याचिका दाखल झाल्यास आमचे म्हणणेही ऐकले जावे व कोणताही एकतर्फी आदेश देऊ नये,’ अशी विनंती अर्जात केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी वकील गणेश म्हस्के तसेच मराठा आरक्षण अभ्यासक प्रशांत भोसले यांच्या वतीने ही कॅवेट दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने सरकारकडे सातत्याने मागणी केली होती की, हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा. त्यानुसार राज्य सरकारने शासन निर्णय काढला असला तरी, त्यावर न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कॅवेट दाखल करण्यात आली आहे.
लक्ष्मण हाकेंचा पवारांवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पवारांनीच रसद पुरवली असल्याचा आरोप करत, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेला आमचा कायम विरोध असून, आमच्या या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करणार असल्याचे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
Maratha Reservation: लक्ष्मण हाकेंचा पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला…”
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून या निषेधार्थ बारामती शहरात ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा प्रा . लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरातून प्रांत कार्यालयासमोर काढण्यात आला. बारामती शहरातील भिगवन चौकातून सुरू झालेला मोर्चा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे प्रांत कार्यालय समोर गेला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रा. हाके यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावरून ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे व इतर नेत्यांवर प्रचंड टीका केली.