Marathi Breaking news live updates राज्यात सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पावसाने अनेक ठिकाणी जोरदार तडाखा दिला आहे. गुरुवारी मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असून, कोकणात सर्वाधिक पाऊस पडला आहे.
आजचा दिवसही राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हवामान खात्याने आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकणातील जिल्हे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे.
20 Jun 2025 07:10 PM (IST)
उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गावरील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या दोन मोबाईल शॉपीवर अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा वळवत शॉपीचे शटर उचकटून ती फोडून, त्यामधून तब्बल ७५ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे चार च्या सुमारास घडली आहे. माणिक मोबाईल शॉपी व कॉर्नर मोबाईल शॉपी या दोन मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या आहेत. या दोन्ही दुकानांमध्ये असलेले विविध कंपन्यांचे ब्रॅण्डेड मोबाईल फोन यांची अंदाजे किंमत ७५ लाख किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
20 Jun 2025 06:32 PM (IST)
China Vs Taiwan: एकीकडे रशिया-यूक्रेन, इस्त्रायल हमास, इस्त्रायल इराण यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे. मध्य युरोपात युद्धाचे संकट गडद झाले आहे. इस्त्रायल इराणची अणुशक्ती नष्ट करण्यासाठी हल्ले करत आहेत. तर दुसरीकडे आता चीन आणि तैवान यांच्यात संघर्ष सुरू होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण चीन आणि तैवानमधील संघर्ष शिगेला पोचला आहे. चीनने उचलेल्या पावलामुळे तैवानची चिंता वाढली आहे.
चीनने आपली 74 लढाऊ विमाने आणि 6 सैन्य जहाजे तैवानच्या दिशेने रवाना केली आहेत. त्यापैकी 50 पेक्षा जास्त लढाऊ विमानांनी तैवानच्या सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली आहे. सामुद्रधुनी ही चीन आणि तैवान यांच्यातील मध्यरेषा समजली जाते. सांमुद्रधुनी ही अनौपचारिक रेषा असून चीन आणि तैवान या देशांना मोकळे करते.
20 Jun 2025 05:48 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले, लीड्स कसोटीला सुरवात झाली आहे. आजपासून दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी , इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी डवाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे.
20 Jun 2025 05:33 PM (IST)
मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत दिल्या. आता यावरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2019 साली ते जेव्हा महाविकास आघाडीत गेले. तेव्हा असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. आज एकच शिवसेना असती. म्हणून कदाचित हे शहाणपण सुचलं असेल, असे संदीप देशपांडे म्हणाले.
20 Jun 2025 05:12 PM (IST)
रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारी 2026 पासून बाजारात येणाऱ्या प्रत्येक नवीन दुचाकींसाठी ABS (Anti-lock Braking System) सक्तीचे करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच यासोबतच नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेट असणे सक्तीचे केले आहे.
20 Jun 2025 05:03 PM (IST)
कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर हद्दवाढीला संमती दिली असल्याने आता हद्दवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून कृती समितीने हद्दवाढ होऊ देणार नाही असा गर्भित इशारा दिला आहे. प्रसंगी रस्त्यावरची लढाई उभी करून हद्दवाढीला विरोध केला जाईल असे ही सांगितले आहे.
20 Jun 2025 04:46 PM (IST)
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृण्मयी देशपांडेने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ती एकटीच नाही, तर तब्बल सहा लोकप्रिय अभिनेत्यांच्या संगतीत आहे! ‘मना’चे श्लोक या आगामी चित्रपटात हे सहा अभिनेते दिसणार असल्याचं आधीच समोर आलं होतं, परंतु आता या नव्या फोटोमुळे चाहत्यांच्या आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.
20 Jun 2025 04:40 PM (IST)
पुणे: एअर इंडियाच्या विमानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेनंतर एअर इंडियाची अनेक विमाने अचानक रद्द झाली आहेत. काहींचे तांत्रिक बिघडामुळे लॅंडींग देखील करण्यात आले. तर आता दिल्ली-पुणे फ्लाइटबाबत देखील अशीच माहिती समोर येत आहे. दिललीवरून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटला पक्षी धडकला. त्यामुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
20 Jun 2025 04:35 PM (IST)
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आठव्या वेतन आयोगाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्याची घोषणा करण्यात आली आहे. सुधारित वेतन रचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. मात्र आयोगाच्या स्थापनेला झालेल्या विलंबामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आयोगाचा एक प्रमुख केंद्रबिंदू ‘फिटमेंट फॅक्टर’ असेल. ७ व्या वेतन आयोगाने हा घटक २.५७ वर ठेवला होता, परंतु ८ व्या वेतन आयोगांतर्गत तो २.८६ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
20 Jun 2025 04:30 PM (IST)
खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
20 Jun 2025 04:25 PM (IST)
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून भाषिका संवेदना वाढली आहे. यातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र या सर्व घडामोडींमध्ये तिसऱ्या भाषेचा पर्याय समोर आला आहे. हिंदी भाषा सक्तीची केली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्यात शिक्षण आणि प्रशासनाच्या पातळीवर हिंदीचा प्रभाव वाढत आहे. विशेषतः ‘त्रिभाषा सूत्रा’च्या माध्यमातून हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
20 Jun 2025 04:21 PM (IST)
कल्याण पश्चिमेतील रामबागेतील आदर्श हिंदी शाळेच्या इमारतीचा काही भाग धोकादायक झाल्याने तो दुरुस्ती करण्यात यावा अशी नोटीस कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी बजावली होती. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती सुरु आहे. मात्र हे काम करण्यात येत असलेले काम थातुरमातुर प्रकारे केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. तसेच दुरुस्तीचे काम कायदेशीर नसेल तर वरिष्ठाच्या पुढील आदेशानुसार शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे यांनी शाळा प्रशासनाला दिला आहे.
20 Jun 2025 04:18 PM (IST)
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरुन आता भाजपच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना प्रमुखांचा ब्रॅंड पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे महाराष्ट्रात नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
20 Jun 2025 04:16 PM (IST)
संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १६० किलोमीटरचा तर ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ६५ किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली. आषाढी वारी सोहळ्यास सुरूवात झाली असून, पुण्यानंतर जिल्ह्यातून हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.
20 Jun 2025 04:08 PM (IST)
गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
20 Jun 2025 04:00 PM (IST)
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात सतत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने रत्नागिरी आणि रायगड सारख्या किनारी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
20 Jun 2025 03:58 PM (IST)
मुंबईतील हॉटेल फेअरमॉन्टमध्ये नाफेडचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.
20 Jun 2025 03:50 PM (IST)
२० जून रोजी सकाळी जेव्हा इस्रायल-इराण तणाव शिगेला होता तेव्हा भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी दिसली. भारतीय बाजारात सेन्सेक्स ८१,३५४ च्या सुरुवातीच्या पातळीवरून ८२,२९७ च्या शिखरावर पोहोचला. म्हणजेच ८०० पेक्षा जास्त अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीने २४,७८७ वरून २५,०७८ ची उचांकी पातळी गाठली आहे.
20 Jun 2025 03:37 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा असा विश्वास आहे की, भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करणे सोपे नसेल आणि यशासाठी त्याला संयमाने काम करावे लागेल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट बदलाच्या टप्प्यातून जात आहे. अशा वेळी, बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाची कमान गिलकडे सोपवली आहे. भारतीय संघाने आजपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरवात केली आहे.
20 Jun 2025 03:15 PM (IST)
आषाढी वारीनिमित संपूर्ण राज्यात आणि पंढरीमध्ये एकच उत्साह आहे. सर्व वारकरी विठ्ठालाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघाले आहेत. मात्र पंढरपूरमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये एकच हळहल व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह पांडुरंगाच्या दर्शनाला आला होता. दरम्यान आज सकाळी तो पुंडलीक मंदिराजवळ चंद्रभागा नदीत अंघोळीसाठी गेल्याचे समजते आहे. मात्र आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नसावा, त्यामुळे तो बुडून मृत्युमुखी पडला असण्याची शक्यता आहे.
20 Jun 2025 03:13 PM (IST)
संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. वैष्णवांचा मेळा असलेल्या या वारीमध्ये आनंद आहे, उत्साह आहे. भक्तीचा सोहळा आहे तर पांडुरंगाप्रती प्रीती आहे. वारी हा केवळ एक सोहळा नाही तर ही एक उपासना आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूनगरीतून प्रस्थान झाले. आजीवन भक्तीमार्गाची कास धरणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा विशेष आहे. अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्यामध्ये असणारा मुक्काम पालखी सोहळ्यातील सौहार्द आणि समतेचे प्रतिक ठरला आहे.
20 Jun 2025 03:04 PM (IST)
आयपीएल संपल्यानंतर मेजर ली क्रिकेट सुरू आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू हे सामील झाले आहेत. मेजर लीग क्रिकेटमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत यामध्ये 34 सामने खळवले जाणार आहेत, यातील दहा सामने आत्तापर्यंत पार पडले आहेत. नजर लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रान्सिको युनिकॉन्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. मेजर लीग क्रिकेट झाल्यानंतर कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात 15 ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेमध्ये देखील 34 सामने खेळवले जाणार आहेत आणि सहा संघ सहभागी होणार आहेत. आता या स्पर्धेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
20 Jun 2025 02:47 PM (IST)
झालेली उधारी देण्यासाठी आईकडे पैसे मागितल्यानंतर आईने पैसे देण्यास नकार दिला. आईने नकार दिल्यानंतर मात्र, चिडलेल्या मुलाने आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कसबा पेठेत ही घटना घडली असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंभो राजु सुर्यवंशी (वय २९) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वहिणीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये ५४ वर्षीय महिलेला मारहाण झाली आहे.
20 Jun 2025 02:46 PM (IST)
NTA ने १७ जून २०२५ रोजी CUET UG Provisional Answer की जारी केली. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी २० जून २०२५ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. या आक्षेपांच्या आधारे CUET UG फायनल आन्सर की तयार केली जाईल. CUET UG फायनल आन्सर की २०२५ जूनच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, CUET UG चा निकाल जुलै २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. CUET UG २०२५ द्वारे देशभरातील २०५ संस्थांमध्ये प्रवेश उपलब्ध असतील.
20 Jun 2025 02:45 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा पहिला सामना आजपासून सुरू होणार आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही एका नवीन युगाची सुरुवात मानली जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन सारखे दिग्गजांनी आधीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्यांदाच पूर्ण युवा संघासह सज्ज झाली आहे.
20 Jun 2025 02:43 PM (IST)
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यनगरीत आगमन होत आहे. यासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. पुणे पोलीस आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येत वारकरी संप्रदाय सहभागी शहरामध्ये दाखल होत असतो. या अनुषंगाने पालखी सोहळ्यामध्ये आग वा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीकरिता अग्निशमन दलाकडून दरवर्षी अग्निशमन वाहन पुणे ते पंढरपूर तैनात करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी अग्निशमन दल देखील तयार झाले आहे.
20 Jun 2025 02:43 PM (IST)
मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षाने आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले आहे. या संघर्षात उत्तर कोरियाने उडी घेतली असून, इस्रायली हल्ल्यांचा निषेध करत अमेरिकेवरही थेट आरोप केले आहेत. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इराणवरील हल्ले हे मानवतेविरुद्धचे अक्षम्य गुन्हे आहेत आणि संपूर्ण प्रदेशाला विनाशाच्या मार्गावर ढकलत आहेत.”
20 Jun 2025 02:42 PM (IST)
‘पंचायत’ वेबसीरीजमधील मंजू देवी अर्थात बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या चर्चेत आहे. लवकरच ‘पंचायत’ वेबसीरीजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच अभिनेत्री नीना गुप्ता ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नीना गुप्ताने मुलाखत दिली आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने आपले विचार उघडपणे व्यक्त केलेले आहेत. मुलाखतीदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने इंटिमेट सीन्सवर भाष्य केले आहे.
20 Jun 2025 02:41 PM (IST)
इराण आणि इस्रायल एकमेकांवर सतत क्षेपणास्त्रे डागत आहेत. दरम्यान, रशिया इराणच्या समर्थनार्थ बाहेर पडला आहे. प्रत्यक्षात, इस्रायली पंतप्रधानांनी म्हटले होते की त्यांचे ध्येय इराणमधील राजवट बदलणे नाही, परंतु त्याच वेळी त्यांनी म्हटले होते की सध्याच्या परिस्थितीमुळे ते शक्य आहे. रशियाने राजवट बदलाची चर्चा पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे सांगितले आहे. इस्रायलच्या सार्वजनिक ब्रॉडकास्टर ‘कान’शी बोलताना नेतान्याहू म्हणाले की, ‘इस्लामिक रिपब्लिकमधील राजवट बदलणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब आहे. याला पर्याय नाही. म्हणूनच मी ते कधीही आमचे ध्येय म्हणून मांडले नाही. हो, हे निश्चितच हल्ल्याचा परिणाम असू शकते, परंतु ते इस्रायलचे औपचारिक ध्येय नाही.’
20 Jun 2025 02:32 PM (IST)
मुंबई बँकेच्या संचालकपदी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची ही जागा रिक्त होती. ठाकरे सेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर हे २०१२–२०१७ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते आणि त्याचवेळी ते मुंबई बँकेचे संचालक होते. अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती.
20 Jun 2025 01:07 PM (IST)
कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे 2 महिन्यांचं बुकिंग 23जून 2025 पासून सुरू होत आहे. यंदा गणेशोत्सव 27ऑगस्ट 2025रोजी असून त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 2 महिने आधी रेल्वेचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पाहता साधारण 23जूनपासून सुरू करावे लागणार आहे. तरीही गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने 25आणि 26 ऑगस्टला कोकणात पोहोचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असणार आहे.
20 Jun 2025 01:03 PM (IST)
यंदा सुक्या बोंबिलांचा तुटवडा होत असल्याचं पहायला मिळत आहे. भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं. त्याचबरोबर मे महिन्यातील पावसामुळे सुकवत ठेवलेल्या मासळी खराब झाल्या त्यामुळे बाजारात सध्या सुक्या बोंबिलांचा तुटवडा होत आहे.
20 Jun 2025 12:58 PM (IST)
शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले हे सध्या चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहेत. भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये भरत गोगावले हे तंत्र मंत्र करणाऱ्या व्यक्तीसमोर बसलेले दिसून आले. भरत गोगावले यांचा हा अंधश्रद्धा करतानाचा व्हिडिओ महायुतीमधील नेत्यानेच पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत आता भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाचा सविस्तर
20 Jun 2025 12:29 PM (IST)
गेल्या देशांतर्गत हंगामात करुण नायरने विदर्भासाठी खूप चांगली कामगिरी केली होती, त्याच्याशिवाय जितेश शर्मा देखील विदर्भाचा भाग होता. त्याच वेळी, क्रिकबझच्या एका अहवालानुसार या दोन्ही खेळाडूंनी नवीन देशांतर्गत हंगामापूर्वी विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. करुण नायरने त्याच्या राज्य संघ कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर जितेश शर्मालाही बडोद्यासाठी खेळायचे आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया १-२ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
20 Jun 2025 12:20 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून भारतातील सॅटेलाईट इंटरनेटबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या अपडेट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, एलन मस्क लवकरच भारतात त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करणार आहे. यासाठी त्याला सरकारकडून मान्यता देखील देण्यात आली आहे. एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटची चर्चा सुरु असतानाच आता व्हिआयच्या सॅटेलाईट इंटरनेटबाबत काही माहिती समोर आली आहे. व्हिआयने त्यांच्या खेड्यातील युजर्सना अधिक चांगली सर्विस देता यावी, यासाठी एक निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर
20 Jun 2025 12:12 PM (IST)
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा आठवडा विमान कंपन्यांसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. अमहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक बिघाड, सुरक्षा धोक्यांसह विविध कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत किंवा वळवली जात आहेत. या सगळ्यात, एअर इंडियाने शुक्रवारी ८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत. उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनने देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत. एअरलाइनने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने या उड्डाणे रद्द केली आहेत.
20 Jun 2025 12:03 PM (IST)
धनुषचा ‘कुबेर’ हा चित्रपट आज २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो साऊथ सुपरस्टार नागार्जुनसोबत दिसत आहे. या चित्रपटाची सुरुवात खूप चांगली झाली आहे असे सांगितले आहे. ‘फिदा’ सारखा हिट चित्रपट बनवणारे शेखर कमुला यांनी याचे दिग्दर्शन केले आहे आणि रश्मिका मंदान्ना देखील या आगामी चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि इमोशनने भरलेला आहे, ज्याची कथा सामाजिक आणि राजकीय कथेवर आधारित आहे.
20 Jun 2025 11:58 AM (IST)
गेल्या आठवड्यात (12 जून) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघातात किमान २७० जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या एका आठवड्यानंतर एक खळबळजनक दावा समोर आला आहे. एअर इंडियाच्या दोन वरिष्ठ विमान परिचारिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, अहमदाबाद अपघाताच्या एक वर्ष आधी बोईंग ७८७ ड्रीमलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दोघांनीही एअरलाइनला दिली होती.
20 Jun 2025 11:42 AM (IST)
इस्रायलच्या बेरशेवा शहरात इराणचा मोठा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे ऑफिस आगीच्या भक्ष्यस्थानी झाले आहे. इराणने बेरशेवा शहरावर केला मिसाईल हल्ला करण्यात आला.
20 Jun 2025 11:27 AM (IST)
सध्या जग इराण आणि इस्रायलमधील युद्धाला तोंड देत आहे. अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमध्ये हल्ले झाले आहेत. आणि १९४१ मध्ये जग दुसऱ्या महायुद्धातून जात होते. या वर्षी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि दुसरे महायुद्ध सुरू झाले. मात्र हे फक्त येथील घटनांबद्दल नाही, तर ते तारीख आणि दिवसाबद्दल देखील आहे. २०२५ चे कॅलेंडर १९४१ च्या कॅलेंडरशी अगदी जुळते. त्या वर्षीचा दिवस आणि यंदाचा दिवस अगदी सारखाच आहे. दोन्ही वर्षे बुधवारी सुरू झाली आणि दोन्ही लीप वर्ष नाहीत. २०२५ आणि १९४१ चे कॅलेंडर अगदी बरोबर जुळतात. दोन्ही वर्षांमधील प्रत्येक तारीख आठवड्याच्या एकाच दिवशी येते परंतु ही मॅट्रिक्समध्ये एकदाच होणारी चूक नाही. कारण ती ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आहे.
20 Jun 2025 11:12 AM (IST)
क्लासरूम घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एसीबी कार्यालयात पोहोचले. यापूर्वी मनीष सिसोदिया यांना ९ जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते त्या दिवशी उपलब्ध नव्हते, त्यानंतर आज म्हणजेच २० जून रोजी दुसरे समन्स बजावण्यात आले.
20 Jun 2025 11:04 AM (IST)
महाराष्ट्रात पहिल्या येते पासूनच हिंदी विषय सक्तीचा करण्यात आला आहे मात्र शासनाच्या या निर्णयाला मनसे शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदी विषय शिकवला गेला तर महाराष्ट्र ध्रुव समजू असा इशारा दिल्यानंतर अंधेरी मनसे विधानसभेच्या वतीने विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षण संचालकांची भेट घेऊन इशारा देण्यात आला सोबतच मनसेकडून अंधेरी पश्चिम परिसरातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांना पत्र देऊन हिंदी विषय शिकवण्यात येऊ नये अशी विनंती देखील करण्यात आली.
20 Jun 2025 10:50 AM (IST)
अहमदाबादमधील अपघातानंतर एअर इंडियाच्या उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. ८ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांसह अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा वळवण्यात आली आहेत. एअर इंडियाने देखभाल आणि ऑपरेशनल कारणे सांगितली आहेत. प्रवाशांना पूर्ण परतफेड किंवा मोफत रीशेड्युलिंगची ऑफर देण्यात आली आहे.
20 Jun 2025 10:50 AM (IST)
भरधाव कारचालकाला पहाटेच्या वेळेस वळणाचा अंदाज न आल्याने कार पाण्याने भरलेल्या खड्यात गेली… बोरटेंभा फाटा येथे उड्डाणपुलाचे काम चालू असलेल्या खड्ड्यात कार पडली. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीमने अपघातग्रस्तांना बाहेर काढून घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं आहे.
20 Jun 2025 09:17 AM (IST)
अमरावतीच्या सुफियाननगर परिसरात एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सनोबार सबा अनिस खान (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार, पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. सनोबार सबा आणि तिचा पती अनिस खान यांचा विवाह 22 जुलै 2023 रोजी झाला होता. दोघे आपल्या लहान मुलीसह सुफियान नगरात भाड्याच्या घरात राहत होते. अनिस खान हा मूळचा चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव पिपरी येथील असून, तो एसी आणि फ्रीज दुरुस्तीचे काम करतो. सनोबारला मायग्रेन तीव्र त्रास असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, तिने टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप अस्पष्ट आहे.
20 Jun 2025 09:17 AM (IST)
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन बंधुंनी एकत्र येऊन निवडणूक लढावी, यासाठी ठाकरे गट आणि मनसे कडून प्रयत्न केले जात आहेत. पण दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीत खोडा घालण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामं यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिनर डिप्लोमसीची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.
20 Jun 2025 09:10 AM (IST)
पॅरिस डायमंड लीग 2025 : आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी क्रिकेट चाहते देखील फार उत्सुक आहेत कारण की नव्या खेळाडूंसह नव्या युगाला भारतीय संघ सुरुवात करणार आहे. याच दरम्यान भारताचा गोल्डन बॉल नीरज चोप्रा हा आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पॅरिस डायमंड लीगला आजपासून सुरुवात होणार आहे.
20 Jun 2025 09:05 AM (IST)
भारतात आज सोन्या आणि चांदीच्या किंमतीनी नवा विक्रम केला आहे. आज भारतात सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. केवळ सोन्यानेच नाही तर चांदीने देखील आज भारतात लाखोंचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सध्या सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसमोर एक नवीन आव्हान आहे. आज 20 जून रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,109 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,266 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,582 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,090 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,820 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 112.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,12,100 रुपये आहे.
20 Jun 2025 09:00 AM (IST)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफीला आजपासून सुरुवात होणार आहे. पतोडी ट्रॉफीचे नाव बदलून अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफी असे देण्यात आले आहे काल त्याचे अनावरण झाले. पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता लीड्समध्ये सुरू होईल. कसोटी क्रिकेट संघ एका नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे, बदलाच्या या टप्प्यात, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज आहे. या मालिकेत ऋषभ पंत टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, याशिवाय पंत फलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंतला गुरुमंत्र दिला आहे.
20 Jun 2025 08:56 AM (IST)
जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंदावलेल्या स्थितीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंद असल्याचे दर्शवितात. गुंतवणूकदारांनी आज कोणते शअर्स खरेदी करावेत, कोणते शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.






