Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates: वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील तारा निखळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वयाच्या 89व्या वर्षी पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. महाराजांच्या पश्चात त्यांची मुलगी आणि दोन मुले आहेत. आळंदी येथे मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
21 Jan 2025 09:54 PM (IST)
नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात हरियाणा राज्यातील आयशर ट्रक चालक राहुल कुमार जगमल सिंह चौधरी याला खेड येथील सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर एसटी बस चालक भाऊसाहेब भास्कर जायभाय (वय ४०)याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. या अपघातात नऊ जणांनी आपला जीव गमावला होता.
21 Jan 2025 09:22 PM (IST)
अमेरिकेच ट्रम्प पर्व सुरू झालं असून डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांच्या या निर्णयांकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असताना आणखी एक मोठा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीत चुकीचं नियोजन, तातडीने आवश्यक सुविधा पोहोचवण्यात अपयश, राजकीय प्रभाव आणि अमेरिकेकडे सतत मोठ्या आर्थिक मदतीची मागणी, WHO मधून बाहरे पडण्याची कारणं देण्यात आली आहेत.
21 Jan 2025 08:57 PM (IST)
भयानक नक्षलवादी नेता प्रताप रेड्डी रामचंद्र रेड्डी उर्फ चलपती (६२) अखेर मारला गेला. ओडिशा सीमेजवळील छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका मोठ्या कारवाईत त्याला ठार मारले. ३६ तासांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत किमान १६ नक्षलवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये चालपतीचाही समावेश होता, ज्याच्या डोक्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याने सुरक्षा दलांवर अनेक धोकादायक हल्ले केले होते. एका आमदाराच्या हत्येमागेही त्याचा हात असल्याचे सांगितले जाते.
21 Jan 2025 08:23 PM (IST)
Turkiye Ski Resort Fire : तुर्कस्तानच्या बोलू पर्वतरांगांमधील ग्रँड कार्टल हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा होपपळून मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक जण जखमी झाले. तसेच, आगीमुळे घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. ही घटना वायव्य तुर्कीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या कार्तलाकाया स्की रिसॉर्टमध्ये घडली. रिसॉर्टमध्ये २३४ जण होते.
21 Jan 2025 07:47 PM (IST)
राजा राणीची गं जोडी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी सोनार लग्नबंधनात अडकली आहे. तिने अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी विवाहगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. अखेर, २१ जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर दोघांनी एकत्ररित्या नव्या आयुष्यात सुरवात केली आहे.
21 Jan 2025 07:25 PM (IST)
इन्स्टावर ओळख आणि ओळखीतून निर्माण झालेले प्रेम... प्रेमाची कहाणी पुढे सरकल्यानंतर मात्र, प्रियकराने तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. त्याचे फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला मित्रासोबतही संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात १८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी १७ वर्षे ६ महिन्याची असताना तिची ओळख आरोपीसोबत इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघे भेटत राहिले. त्यावर आरोपीने तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरूद्ध शरीर संबंध ठेवले. याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. नंतर हेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला त्याच्या मित्रासोबतही संबंध ठेवण्यास सांगितले. नकार दिल्यानंतर तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीला जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान त्यानंतर ही दोघे वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करत होते. शेवटी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे करीत आहेत.
21 Jan 2025 06:27 PM (IST)
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि कालकाजी मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी रमेश बिधुरी यांचे पुतणे आणि भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हे लोक आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप आहे.
21 Jan 2025 06:06 PM (IST)
वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर स्थापन केलेल्या जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले, आम्ही उत्तर प्रदेश सरकार, सुन्नी आणि शिया वक्फ बोर्ड आणि सर्व संघटनांच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहोत. लखनौपूर्वी आम्ही पटना आणि कोलकाता येथेही गेलो होतो. वक्फचा उद्देश धर्म आणि दानधर्म आहे. गरीब आणि पसमंडा मुस्लिमांना याचा फायदा झाला पाहिजे. आज आपण पाहत आहोत की वक्फ मालमत्तेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत आहेत परंतु वक्फ मालमत्ता देवाच्या नावावर आहे. म्हणून, वक्फचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून सरकारने एक सुधारणा आणली आहे.
21 Jan 2025 05:39 PM (IST)
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जिथे कोणताही बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत असेल, त्याला लवकरात लवकर हाकलून लावावे. सैफ अली खानच्या घरी घडलेली घटना खूप चिंताजनक आहे. मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी हे ऑडिट आवश्यक आहे.
21 Jan 2025 05:24 PM (IST)
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात इंग्लंडचा 79 धावांनी धुव्वा उडवला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 19.2 ओव्हरमध्ये 118 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने अशाप्रकारे या सामन्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
21 Jan 2025 05:21 PM (IST)
अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो त्याच्या घरी पोहोचला आहे. घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १५ जानेवारीच्या रात्री त्याच्यावर हल्ला झाला.
21 Jan 2025 04:25 PM (IST)
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळांचा जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
21 Jan 2025 03:54 PM (IST)
मुंबई: सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
21 Jan 2025 03:11 PM (IST)
केंद्र सरकारने एक राष्ट्र एक निवडणूक या योजनेसाठी जेपीसीची स्थापना केली आहे. जेपीसीची पुढील बैठक आता ३१ जानेवारी रोजी होणार आहे.
21 Jan 2025 02:42 PM (IST)
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. 29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. या सीसीटीव्हीच्या रुपाने खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.
21 Jan 2025 02:01 PM (IST)
दिल्ली मतदार यादीतून नावे वगळल्याच्या कथित टिप्पण्यांवरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात केजरीवाल आणि आतिशी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने खटल्याच्या न्यायालयाच्या कामकाजावरील स्थगिती आणखी 6 आठवड्यांसाठी वाढवली, तक्रारदार भाजप नेते राजीव बब्बर यांना उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी 6 आठवड्यांची मुदत दिली.
21 Jan 2025 01:58 PM (IST)
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची बातमी अद्याप ताजी असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सैफ अली खानच्या कुटुंबाची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता मध्यप्रदेश सरकार आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची मालमत्ता भोपाळमधील कोहेफिजा ते चिकलोडपर्यंत पसरलेली आहे. पतौडी कुटुंबाच्या सुमारे 100 एकर जमिनीवर आज दीड लाखांहून अधिक लोक राहत आहेत. भोपाळ राज्यातील ऐतिहासिक मालमत्तांवरील २०१५ पासूनची स्थगिती रद्द करण्यात आल्यामुळे पतौडी कुटुंबाची ही जमीन मध्य प्रदेश सरकारच आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
21 Jan 2025 11:34 AM (IST)
अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसखोरी करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहजादने पोलिसांकडे वेगळीच कबूली दिली आहे. चोरी करताना ते घर सैफ अली खानचं घर आहे हे आपल्याला माहितीचं नव्हतं, असा दावा शाहजादने केला आहे.
21 Jan 2025 10:36 AM (IST)
दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात, केज न्यायालयाने मकोका आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून, ती आता गुरुवारी केज न्यायालयात होणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी कराडला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. शनिवारी आरोपीचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे सोमवारी (20 जानेवारीला ) सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, प्रत मिळालेली नसल्याचे कारण देत पुन्हा ॲड. कराड यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. यानंतर न्या. एस. व्ही. पावसकर यांनी गुरुवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.