नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष होत असल्याने लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आज, बुधवार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.














