फोटो सौजन्य- Youtube
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज महाराष्ट्र राज्य सरकारने अभिजात मराठी सन्मान सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहत त्यांनी सुरुवातीला मराठीतून संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त त्यांना दिलेला मानाचा मुजरा आहे. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या लोकांना दशकांपासून वाट पहात होते. मला आनंद होत आहे की महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्यात माझे काही योगदान मला देता आले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृध्द आहे. या भाषेतून ज्ञानाचा झरा वाहिला त्यामुळे अनेक पिढींचे मार्गदर्शन झाले आहे. आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे.
संतांचा गौरव
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतूनच वेदांन्त चर्चेला जनमानसाशी जोडले. ज्ञानेश्वरीने गीताच्या ज्ञानाशी भारताच्या आध्यात्मिक प्रज्ञेला पुनर्जागृत केले. संत नामदेव यांनी भक्तीमार्गाच्या चेतनेला मजबूत केले. संत तुकाराम यांनी मराठी भाषेतूनच धार्मिक जागृकतेचे अभियान चालविले आणि संत चोखामेळाने सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनाला सशक्त केले. आज महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढविणाऱ्या थोर संतांस मी साष्टांग दंडवत करतो.
मराठी भाषेचे योगदान
मोदी पुढे म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मराठी भाषेच्या योगदानाने समृध्द होतो. लोकमान्य टिळकांनी केसरी च्या माध्यमातून परदेशी सत्तेची मुळे हलवली होती. मराठीमध्ये दिलेल्या अनेक भाषणांनी जनमानसात स्वराज्य मिळविण्याची इच्छा जागृत केली होती. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक वृत्तपत्राद्वारे सामाजिक सुधारणांच्या अभियानाला घरोघरी पोहचविले. महाराष्ट्रात मराठी साहित्याद्वाराच स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीच्या चेतनेचा विस्तार झाला.
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ ते औद्योगिक मराठी भाषेचे योगदान आणि भाषेचे विविध पैलूविषयी पंतप्रधान मोदीं यांनी भाषणात उल्लेख केला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आदी उपस्थित होते.