Top Marathi News Today Live : होर्मुझमध्ये पुन्हा खळबळ ! मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य
26 Jun 2026 10:30 AM (IST)
काराकस : व्हेनेझुएलात ४० सेकंदात झालेल्या सलग दोन भूकंपामुळे मोठ्या जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपाने हजारो लोकांना बेघर केले असून मृतांचा आकडा २०० पार झाला आहे.अनेक भागांमध्ये बहुमजली इमारती पडल्या असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. इमारतीच्यां ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे.
26 Jun 2026 10:20 AM (IST)
संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे ते भीषण दृश्य आणि न्यायासाठीची ऐतिहासिक कायदेशीर लढाई पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये जिवंत होणार आहे. मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन यांनी गुरुवार, २५ जून २०२६ रोजी राजकुमार रावच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित केला. हा चित्रपट भारताचे सर्वात प्रसिद्ध आणि धाडसी सरकारी वकील, उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे. या टीझरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. १ मिनिट ५४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचे उल्लेखनीय परिवर्तन आणि त्याचा अभिनय दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या अंगावर शहारे येत आहेत आणि लोक त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशी भविष्यवाणी करत आहेत.
26 Jun 2026 10:10 AM (IST)
जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
26 Jun 2026 10:00 AM (IST)
दौंड नगरपरिषदेत महिला अधिकाऱ्याचा विनयभंग राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. दौंड नगरपरिषद कार्यालयात महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषद परिसरात खळबळ उडाली आहे.
26 Jun 2026 09:50 AM (IST)
झारखंडच्या रामगड जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली. यामध्ये दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रामगड जिल्ह्यातील राजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लारीजवळ घडला. रामगड-बोकारो रस्त्यावर एक प्रवासी वाहन आणि ट्रक यांची जोरदार धडक झाली, ज्यात बँड-ताशा पथकाचे सदस्य गंभीर जखमी झाले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीला तातडीने रामगड सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
26 Jun 2026 09:40 AM (IST)
अंतर्गत ठरलेल्या समझोत्यानुसार तत्कालीन नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते महेश खडके यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या हस्ते नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
26 Jun 2026 09:30 AM (IST)
नवी मुंबईत अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसेच, मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची ‘महालेखापाल’ यांच्या विशेष कृती दलामार्फत सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
Marathi Breaking News Updates : जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारी मार्ग होर्मुझ स्ट्रेटमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याचे वृत्त ब्रिटिश लष्कराने दिले. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) हल्ल्यात अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी सुरु असलेली मोहिम तात्पुरती स्थगित केली आहे. या हल्ल्याचा आरोप अमेरिकेने इराणवर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे ७.५ नॉटिकल मैल अंतरावर एव्हर लव्हली या मालवाहू जहाजावर हा हल्ला झाला. जहाजाच्या कंट्रोल रुमचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.






