( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Rating For the Movie: 3.5*/5
अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. ‘वेलकम टू द जंगल’ (वेलकम टू द जंगल रिव्ह्यू) या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारने बॉक्स ऑफिसवर जोरदार पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अहमद खान यांनी केले आहे. फिरोज ए. नाडियाडवाला, स्टार स्टुडिओ १८, सीता फिल्म्स आणि राकेश डांग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चाहते बऱ्याच काळापासून ‘वेलकम टू द जंगल’च्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. आता ‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शित झाल्याने, लोक चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत.
काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा एका प्रभावशाली उद्योगपतीभोवती फिरते. सरकार बदलल्यास आपल्या काळ्या पैशांचा पर्दाफाश होईल, या भीतीने तो हजारो कोटी रुपयांचा चित्रपट बनवून तो मुद्दाम फ्लॉप करण्याचा प्लॅन आखतो. यासाठी फ्लॉप दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांची टीम तयार केली जाते.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मात्र अनपेक्षित घटना घडते. रील लाइफमध्ये गावाला दहशतवाद्यांपासून वाचवणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही दहशतवाद्यांच्या तावडीत अडकतात. त्यानंतर सुरू होतो ॲक्शन, कॉमेडी आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला थरारक प्रवास. पुढे काय घडते, यासाठी चित्रपटगृहात जाऊनच अनुभव घ्यावा लागेल.
चित्रपटात कलाकरांची तगडी फौज
तब्बल २ तास ४३ मिनिटे लांबीच्या या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अरशद वारसी, जॉनी लिव्हर, परेश रावल, राजपाल यादव, जॅकी श्रॉफ, श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता आणि फरिदा जलाल यांची तगडी स्टारकास्ट आहे.
अभिनय कसा आहे?
अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकते. दोघांची केमिस्ट्री जुन्या सुपरहिट चित्रपटांची आठवण करून देते. जॉनी लिव्हर, परेश रावल, अरशद वारसी आणि राजपाल यादव यांनी त्यांच्या भन्नाट कॉमिक टायमिंगने प्रत्येक प्रसंग रंगतदार केला आहे. जॅकी श्रॉफ आणि इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
संगीत आणि पार्श्वसंगीत
चित्रपटातील गाणी मनोरंजनाचा दर्जा उंचावतात. विशेष म्हणजे भोजपुरी गाण्याचा तडका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. पार्श्वसंगीतही ॲक्शन आणि भावनिक प्रसंगांना प्रभावी साथ देते.
पाहावा की नाही?
‘वेलकम टू द जंगल’ हा केवळ कॉमेडी चित्रपट नाही, तर त्यात ॲक्शन, इमोशन आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा उत्तम संगम आहे. एवढी मोठी स्टारकास्ट असूनही दिग्दर्शक अहमद खान यांनी प्रत्येक कलाकाराला योग्य वाव दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट विकेंडला संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो.






