भाईंदर/ विजय काते :- सध्या हिंदी सक्तीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. याचपार्श्वभूमीवर मीरारोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाराच्या कानशिलात लगावली होती. मिरारोड मध्ये मनसैनिकांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकान मालकास चांगला चोप दिला आहे.मिरारोडच्या बालाजी हॉटेल जवळ ही घटना घडली आहे.मिरारोडचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दुकान चालकाच्या कानशिलात लगावली आहे.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिरोरोड येथील एका हिंदी भाषिक दुकानाला मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.दुकान मालकाने मराठी भाषा बोलण्यास नकार दिला.यावेळी आपण ज्या राज्यात नोकरी व्यवसाय करता,त्या भाषेचा आदर का करत नाही असे अनेक प्रश्न मनसैनिकांनी विचारले. योग्य उत्तर दुकान मालकाकडून न मिळाल्याने मनसैनिकानी चांगलच चोप दिला.
मीरा-भाईंदर शहरामध्ये एका अमराठी दुकानदारावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शहरातील वातावरण तापले आहे. या घटनेचा विरोधामध्ये अमराठी दुकानदारांनी काढलेल्या मोर्चा नंतर शहरातील सर्व मराठी भाषिक नागरिक, मराठीप्रेमी संघटना आणि स्थानिक दुकानदारांनी एकत्र येत आज रस्त्यावर उतरून आंदोलनाचा निर्धार केला आहे. आज या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि अधिकृत निवेदन सादर करण्यासाठी शेकडो मराठीप्रेमी नागरिक पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयासमोर जमले होते.
या आंदोलनाचा मुख्य हेतू म्हणजे ८ जुलै रोजी संपूर्ण मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी आणि मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी एक भव्य निदर्शने आणि मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मराठी संस्कृती, भाषा आणि सन्मान टिकवण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.या वेळी जमलेल्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले. शहरातील मराठी समाजावर होणाऱ्या अन्यायामागे आणि वातावरण बिघडविण्यामागे त्यांचा हात असल्याचा आरोप करत, “भाजप सरकारने मराठी माणसावर गळचेपी करण्याचे षड्यंत्र रचले आहे, पण हे षड्यंत्र मीरा-भाईंदरच्या मातीत उखडून टाकण्यात येईल,” असा तीव्र इशारा आंदोलकांनी दिला.मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता समाजात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे व्यापाऱ्यांचे बंद, तर दुसरीकडे नागरिकांचा रस्त्यावरचा एल्गार – या सर्व घटनांनी आगामी ८ जुलैचे आंदोलन निर्णायक ठरणार आहे.