 
        
        Thane- Diva Political News, Voter list
Thane News :- ठाणे, (जि.प्र.) कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या संदर्भात गुरुवारी दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार, भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी महाविकास आघाडीला भाजपानेही त्यांच्या मागणीला साथ मिळाल्याचे दिसून आले.
यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखअॅड. रोहिदास मुंडे, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्याबरोबर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ही महाविकास आघाडीच्या मागणीला साथ दिल्याचे दिसून आले.
संबंधित पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, वार्ड क्र. २७ आणि २८ क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण १७ हजार २५८ इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब पारदर्शकता धोक्यात आणणारी व मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली.
दुबार नाव वगळावी या मागणीचे निवेदन देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर भारतीय जनता पार्टी दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत हे ही उपस्थित होते. परिणामी आता ठाणे पाठोपाठ दिव्यातही महायुती मध्ये आलबेल नसल्याची कुजबुज यानिमित्ताने होऊ लागली आहे.
अशाप्रकरच्या नोंदी टाळण्याची सूचना
तसेच, भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.






