कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी दळी जमिनीतून रस्ता करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा 13 किलोमीटर लांबीचा रस्ता बनविण्यास परवानगी दिली आहे. मात्र वन विभाग त्या जमिनीतून रस्ता करण्यास परवानगी देत नाही आणि त्यामुळे आदिवासी कार्यकर्ते आत्मदहन करणार आहेत. जैतू पारधी आणि गणेश पारधी हे आत्मदहन करणार असून या रस्त्यासाठी हे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत.
कर्जत तालुक्यातील माथेरान चे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्या वन जमिनीवर वसल्या आहेत. तब्बल 200 वर्षे जुन्या असलेल्या या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता शासन तयार करीत आहेत. त्यातील संबंधित 12 आदिवासी वाड्या ह्या माथेरान डोंगर पट्ट्यात पिढयांनपिढ्या ब्रिटिश काळापासून वसलेल्या असून स्वातंत्र मिळून 78 वर्षे होऊन सुद्धा रस्त्यापासून वंचित आहोत. आदिवासी लोकांना रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने वाटेतच दोन आदिवासी लोकांचे मृत्यू झाले आहेत.
कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे. वन विभागाने या रस्त्यातील काही भागाला अद्याप परवानगी दिलेली नाही. माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतमधील रस्त्यासाठी वनविभागाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. कायद्यात बसत असून सुद्धा वनविभाग कार्यालयाकडून जाणीवपूर्वक मंजुरी मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज नाराज आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत जाणीपूर्वक वनविभागाकडून 3/2 चा दावा मंजूर केला नाही. कायद्यातबसून सुध्दा वनविभाग कार्यालयाकडून जाणीपूर्वक मंजूरी मिळत नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते गणेश पारधी आणि जैतू पारधी हे उद्या मंगळवार 21 एप्रिल रोजी वनविभाग कार्यालय कर्जत येथे आत्मदहन करणार आहेत. त्या दोन्ही कार्यकर्त्यांनी आत्मदहन करू नये यासाठी वन विभागाचे वनक्षेत्रपाल समीर खेडेकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी प्रयत्न केले. मात्र वन विभाग दोन वर्षात परवानगी देऊ शकले नाही आणि त्यामुळे वन विभागाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन होणार आहे.






