परळमधील स्मारक कागदावरच! बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याची केली होती घोषणा
परळ येथील बोआयटी चाळीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तब्बल २२ वर्षे वास्तव्य होते. या कालावधीतील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार हे निवासस्थान आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत या बाबत कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक निश्चित झालेच पाहिजे, आमच्यासाठीही ही अभिमानाची बाब आहे पण ते करताना आमचेही याच परिसरात पुनर्वसन झाले पाहिजे, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. परळ येथील बीआयटी चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. १९१२ ते १९३४ या कालावधीत २२ वर्षे बाबासाहेब परळ येथील या निवासस्थानी राहिले. याच घरातून त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला होता. गोलमेज परिषदेलाही ते येथूनच गेले होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज 2026 मध्ये नैऋत्य मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
परळ हे गिरणगाव म्हणून ओळखले जाते. या परळच्या मातीत आजही बाबासाहेबांच्या स्मृती या निवासस्थानाच्या रूपाने जतन आहेत.दरवर्षी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरच्या दिवशी या ठिकाणी देशभरातून आंबेडकरी जनता वंदन करायला येत असते.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करण्यात येईल अशी घोषणा केली होती.दरम्यान, स्मारकाच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे. मात्र त्यानंतर कोरोना काळ आला व ही घोषणा केवळ कागदावरच राहिली. याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.बाजूच्याच दामोदर नाटयगृह येथेही त्यांचे कार्यालय होते.शाहू महाराजही याच ठिकाणी बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते.त्यामुळे या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात आहे.
बीआयटी चाळीत बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे, ही आमचीही भावना आहे. पण हे करताना स्थानिक रहिवाशांचाही विचार व्हावा. बाबासाहेबांच्या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक होताना पाहणे ही आमचीही इच्छा आहेच. पण स्थानिक रहिवाशांचे देखील याच परिसरात पुनर्वसन झाले पाहिजे, अशी माहिती विलास गायकवाड, अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती यांनी दिली आहे.
सरकारने राष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली पण पुढे याचे काहीच झाले नाही. आमच्या एकूण सहा इमारती आहेत. या इमारतीमध्ये ४८० रहिवासी कुटुंबे आहेत. आमचे देखील ‘इन-सिटू’ म्हणजेच याच परिसरात पुनर्वसन व्हावी अशी आमची इच्छा आहे. बीडीडी चाळवासियांना ज्या प्रकारे न्याय मिळाला तसाच न्याय राज्य सरकारने आम्हालाही द्यावा, असे गायकवाड म्हणाले, राज्य सरकारने तातडीने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी इच्छा गायकवाड यांनी व्यक्त केली.






